महाराष्ट्रात नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. जवळपास सर्वच मतदार संघात अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती यातीलच हायव्होल्टेज मतदार संघ असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात लढत झाली.
त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनावणे या दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणूकीच्या काळातील प्रचारादरम्यान झालेल्या खर्चात तफावत आढळून आल्याने निवडणूक आयोगाने महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी नोटीस जारी केली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अभिलेखाची तिसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक सुशांतकुमार बिस्वास यांनी 12 मे रोजी केली होती. या तपासणीमध्ये बजरंग सोनवणे यांनी 7 ते 10 मे या कालावधीतील खर्च सादर केला.
पहिल्या व दुसऱ्या खर्चातील तफावत अनुक्रमे 5 लाख 31 हजार 294 व 4 लाख 27 हजार अशी एकुण 9 लाख 59 हजार 231 ऐवढी तफावत मान्य केली. मात्र, सदरील रक्कम नोंदवहीमध्ये समाविष्ट करून तशी नोंद घेणे आवश्यक असताना ती नोंद घेतली नाही त्यामुळे 22 एप्रिल ते 10 मे या कालावधीतील खर्चामध्ये छायांकित निरीक्षण नोंदवहीशी तुलना करताना 9 लाख 59 हजार 231 एवढी तफावत आढळून आली आहे.
खर्च मान्य करूनही तशी नोंद आपल्या निवडणूक खर्च नोंदवहीमध्ये का घेतली नाही? याबाबत लेखी खुलासा तात्काळ सादर करण्याचा आदेश दिला होता. तसेच तफावत रक्कम निवडणूक खर्चात समाविष्ट करून तपासणीकरिता सादर करण्याची सूचना सोनवणे यांना दिली होती. मात्र सोनवणे यांनी सादर केलेला खुलासा संयुक्तिक नव्हता. मान्य केलेली तफावतीची एकूण 9 लाख 59 हजार 231 रक्कम निवडणूक खर्च नोंदवहीमध्ये समाविष्ट करावी व ही नोंदवही तपासणीसाठी सादर करून तपासणी करून घ्यावी. तफावत राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवण्यात कसूर केल्याचे गृहीत धरून कारवाई करण्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोनवणे यांना दिली आहे.
तर दुसरीकडे, पंकजा मुंडे यांच्याही खर्चाची तपासणी करण्यात आली. या कालावधीत 16 लाख 66 हजार 431 एवढ्या रकमेची तफावत दिसून आली. तर 3 मे 10 मे या कालावधीत एकूण 20 लाख 94 हजार 40 एवढ्या रकमेची तफावत आढळून आल्याने मुंडे यांना नोटीस बजावली होती. नोटिसीमध्ये दर्शविलेल्या रकमेची तफावत पंकजा मुंडे यांनी मान्य केली.
दरम्यान, ही रक्कम खर्चात समाविष्ट करुन निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करून तपासणी करून घ्यावी, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दैनंदिन हिशोब नोंदवही अभिलेखे अचूक व नियमितरीत्या सादर करावी, त्यात तफावत राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पंकजा मुंडेंना करण्यात आली आहे.