लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पूर्ण झाली आहे.जवळजवळ ५२ दिवसांत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.देशात पाच टप्प्यातील मतदानानंतर भाजपकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.मतदानाच्या पाचव्या टप्प्यानंतर भाजपनं सर्व राज्यांचे अहवाल, सर्वेक्षण संस्थांचे अहवाल आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मोठ्या विजयाचा दावा केला.पण या सर्व्हेत महाराष्ट्राबाबत काय स्थिती वर्तवण्यात आली आहे.कोणत्या राज्यांत फायदा आणि कुठे फटका बसणार ? या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
मोदी मॅजिकमुळे भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास नेते व पदाधिकाऱ्यांना आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांसह ५ टप्प्यांतील मतदानाचा आढावा घेतला. त्याआधारेच भाजपचा मोठा विजय होईल असा दावा केला जात आहे. मतदान पार पडलेल्या राज्यांमधील नेते, उमेदवार दिल्ली गाठू लागले आहेत.मोदींच्या करिश्म्यापुढे अन्य समीकरणं फोल ठरत असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळेच मोदी हॅट्ट्रिक करणार असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. अमित शहादेखील पाचव्या टप्प्यानंतर एनडीएनं ३०० जागांचा टप्पा पार केल्याचं सभांमधून सांगत आहेत. पुढच्या दोन टप्प्यांमध्ये ११४ जागा आहेत. त्यांच्या व्यवस्थापनासाठी भाजपनं प्रत्येक मतदारसंघात एक ज्येष्ठ नेते, एक खासदार, राज्यातील ज्येष्ठ नेते आणि बाहेरुन १०० कार्यकर्ते पाठवले असल्याचं बोललं जातं.आपण महाराष्ट्राकडे येण्याआधी इतर राज्यांमध्ये वर्तवण्यात आलेला अंदाज आधी पाहुयात… भाजप नेत्यांच्या अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे. पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल. तर महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणात भाजपला फटका बसेल. या राज्यांत होणाऱ्या नुकसानाची भरपाई पश्चिम बंगाल,ओडिसा, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधून होईल अशी चर्चा आहे.यावेळी ओडिसाची लढाई रंजक आहे. भाजपला इथं आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे… २००९ च्या निवडणुकीत शून्यावर असलेल्या भाजपने २०१४ च्या निवडणुकीत पहिलं खातं उघडलं. त्यांनी २१.९ टक्के मतांसह १ जागा जिंकली. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा केली. ३८.९ टक्के मतांसह राज्यातील लोकसभेच्या आठ जागा जिंकल्या.२०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये राज्यातील सत्ताधारी बिजू जनता दलाच्या पाठिंब्यामध्ये थोडीशी घट झाली आहे. बीजेडीला २०१४ मध्ये ४४. ८ टक्के मते मिळाली होती, तर २०१९ मध्ये ती ४३.३ टक्के झाली. त्याच वेळी, भाजपचा पाठींबाही सातत्याने वाढत आहे, २०१४ मध्ये त्यांनी २१.९ टक्के मते मिळवली होती, तर २०१९ मध्ये त्यांना ३८.९ टक्के मते मिळाली होती. दरम्यान, भाजपचा जनाधार वाढल्याने ओडिशाच्या राजकारणात काँग्रेस एक प्रकारे नगण्य बनली असल्याचं बोललं जातं…
उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने इथं ६४ जागा जिंकल्या होत्या.यावेळी त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महाराष्ट्रात नुकसान झाल्यास त्याचा तोटा भरून काढण्यासाठी यूपीत भाजपने सर्व शक्ती पणाला लावल्याचं दिसून येतं…या सर्व्हेनुसार भाजपला महाराष्ट्रात फटका बसणार याची कारणं उघड आहेत असं आपण बोलू शकतो.कारण गेल्या पाच वर्षात झालेली मोठी राजकीय उलथापालथ चित्र बदलवणारी ठरू शकते.महाराष्ट्रात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडूनही परिस्थिती फलदायी ठरत नाही. किंबहुना त्याबद्दलचा रोषच लोकांमध्ये दिसून येतो. अशा परिस्थितीत हिंदुत्वाबद्दल बोलत राहणे ही राजकीय मजबुरी आणि आवश्यकताही ठरली.पक्ष फोडल्यानं महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ‘सहानुभूतीची लाट’ असल्याचं दिसून आलं आहे.महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या अशी अनेक आव्हानं उभी आहेत. मात्र पंतप्रधान मोदीमुळं भाजपा निवडणुकीत यश मिळवेल अशी आशा पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते…महाराष्ट्र हा कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र अंतर्गत गटबाजीचं आव्हान कॉंग्रेससमोर नेहमीच होतं. असं असताना देखील मराठवाडा, विदर्भात असे काही भाग आहेत जिथं अजूनही कॉंग्रेसची ताकद असल्याचं पाहायला मिळतं.एकेकाळी महाराष्ट्रात मुख्य लढत कॉंग्रेस आणि शिवसेना-भाजपमध्ये असायची.१९८४ मध्ये शिवसेना आणि भाजप पहिल्यांदा बिगर-कॉंग्रेसवादाच्या नावावर एकत्र आले होते.२०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन आणि त्यानंतर अंतर्गत वादामुळं शिवसेनेची ताकद कमी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळं २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या.तर २०१९ मध्ये भाजपा, शिवसेना युतीनं लोकसभेच्या ४१ जागा जिंकल्या होत्या.या यशासाठी पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा, पुलवामा इत्यादी कारणं असल्याचं मत विश्लेषक व्यक्त करतात.पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे.महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये झालेली लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीने लढली गेली. १ एप्रिल रोजी घेतलेल्या सर्व्हेक्षणात भाजपला आघाडी दिसत होती. त्यावेळी भाजपच्या दहा-वीस जागा कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात अशी स्थिती होती. पण नंतर ज्या प्रकारचा प्रचार झाला त्यावरून अंदाज वर्वतला जाऊ लागला की भाजपला उत्तोरोत्तर आहे त्या जागा अवघड जातील. त्या किती कमी होतील हे अनिश्चित आहे. २०१४ किंवा २०१९ सारखा उत्साह सध्या दिसत नाही.भाजपने दावा केल्याप्रमाणे यावेळी त्यांच्या जागा वाढणं हे सध्यातरी अवघड वाटतंय.असं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत…महाराष्ट्रातील जनता राजकीयदृष्ट्या खूप जागरूक असल्याचं दिसून येतं…यावेळी मतदान करताना त्यांचा नेता किती प्रामाणिक आहे हे मतदारांनी पहिल्याचं चित्र दिसून आलं आहे.महाराष्ट्रातील जनतेकडे अनेक पर्याय आहेत. गेल्या तीन वर्षांत राज्यात एकही मोठी निवडणूक झालेली नाही. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होत नाही. महाराष्ट्रातील पक्षांच्या फोडाफोडीचा निकाल ही लोकसभा निवडणूक देणार आहे.एकूणच हि सर्व राजकीय परिस्थती पाहता भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात या मुद्यांवर विचार केला गेला असावा.आणि त्यामुळे नुकसान होऊ शकतं असा अंदाज वर्तवला गेला असेल.