मुंबई | उन्हाळा संपत आला की, मान्सूनची प्रतिक्षा असते. आता अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू पुढे सरकरत लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजे, येत्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
मालदीव, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात 19 मे पर्यंत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं याआधीच दिली होती. तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या शेवटी नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो मात्र, यंदा मान्सून काहीसा लवकर दाखल होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर 10 व 11 जून दरम्यान मुंबईत मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहील. तसेच सरासरीच्या 106 टक्के मान्सून होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. यावर्षी पावसाळ्यात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी निनोच्या परिस्थितीमुळे मान्सून कमकुवत होता मात्र, यंदा पाऊस समाधानकारक असेल, असंही हवामान विभागाने म्हटलंय.