लोकसभा निवडणुकीचा आता फक्त एक टप्पा बाकी आहे. सात टप्प्यातील निवडणूक जवळपास पूर्ण होत आली आहे. ४ जूनला निकाल जाहीर होईल.NDA आघाडी आणि INDIA आघाडीकडून जोरदार प्रचार ही अंतिम टप्प्यात आला आहे. अशात सर्वपक्षीय नेत्यांकडून दावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमित शाहांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली.. या मुलाखतीत अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आला की, घड्याळाचे काटे उलटे फिरवून २०१९ ची परिस्थिती पु्न्हा आणणे शक्य असते तर तुम्ही महाराष्ट्रात वेगळ्याप्रकारे गोष्टी केल्या असत्या का? यावर अमित शाह म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळाले होते. शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना आमच्याकडून तोडले. उद्धव ठाकरे आमचे मित्र होते, आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती. ते आमचे मित्र होते, आम्ही निवडणूक एकत्रपणे युतीत लढवली होती. ज्याने हे सगळं सुरु केलं त्यानेच हे संपवलं पाहिजे.असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे. राज्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार का या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं. अमित शाह म्हणाले, राज्यात आमची शिवसेनेशी युती आहे, आणि युतीत सर्वकाही आलबेल आहे .
अमित शाह यांनी बहुमत आणि नरेंद्र मोदी यांच्यावर विचारलेल्या प्रश्नांना ही उत्तर दिलं.विरोधी पक्ष किती सक्षम असावा हा निर्णय आता जनतेनं घ्यावा असं शाह म्हणाले. अखेरचा टप्पा पार होण्याआधीच एनडीएने ३०० जागांचा आकडा गाठल्याचं ते म्हणाले. आम्ही अखेरचा टप्पा गाठण्याआधीच बहुमताचा टप्पा गाठला आहे. आम्ही शेवटच्या टप्प्या अगोदर ३०० ते ३५० जागांच्या आसपास होतो. अजून यामध्ये शेवटच्या टप्प्यातील जागा नाहीत.अखेरचा टप्पा पार होण्याअगोदरच भाजप सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत होते. आम्ही ४०० पार जाणार आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विरोधकांच्या वक्तव्यावर अमित शाह म्हणाले, नरेंद्र मोदी आपली टर्म पूर्ण करतील.तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील. याबाबत भाजपात कोणताही संभ्रम नाही. विरोधक मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढच नाही तर जून २०२९ मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच नेतृत्व करतील असेही अमित शाह म्हणाले.