पुण्यातील पोर्शे हीट अँड रन प्रकरणी रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. अशा परिस्थितीत आता कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळतंय. याप्रकरणी रवींद्र धंगेकरांना प्रशासनावर टीकास्त्र डागलंय. पोर्शे हीट अँड रन प्रकरणात पोलीसांनी पैसे लाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी फॉर द पीपल न्यूजशी बोलताना केलाय. सोबतंच या प्रकरणात जो कुणी दोषी असेल त्यावर कारवाई करा अशी मागणी करताना रवींद्र धंगेकरांनी ‘उद्या कोणत्याही प्रकरणात मी दोषी आढळल्यास माझ्यावरही सक्त कारवाई झाली पाहिजे’ असं आवाहन पोलीस प्रशासनाला केलंय.
पोर्शे हीट अँड रन प्रकरणी कसबा विधानसभा णतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी फॉर द पीपल न्यूजशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याप्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाने आजवर अनेक गुन्हे केले आहेत. वेदांत अग्रवाल याने याआधीही अनेकदा अशाच प्रकारे अनेकांना त्रास दिला आहे. त्याची मानसिकता आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीची होती. त्याचे वय 17 वर्षे असलं तरी त्याच्यावर सज्ञान गुन्हेगाराप्रमाणे कारवाई करावी अशी मागणीही यावेळी रवींद्र धंगेकरांनी केली.
विशेष म्हणजे याप्रकरणात रवींद्र धंगेकरांनी आजवर अनेकदा प्रशासनाकडे याप्रकरणी पारदर्शक तपास करावा अशी मागणी केली आहे. याप्रकरणात आपण केवळ आंदोलन नाही तर समाजात जनजागृती करत असल्याचंही रवींद्र धंगेकर यावेळी म्हणाले. याप्रकरणात वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर झालेल्या आरोपांचीही चौकशी व्हायला हवी असही यावेळी रवींद्र धंगेकरांनी अधोरेखित केलं आहे. त्यामुळे आता रवींद्र धंगेकरांच्या या मागणीकडे प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.