कालीचरण बाबा याने नाशिकमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात स्त्रिंयाबाबत आक्षेपार्ह विधान केलं. “जगातील तमाम सुंदर महिलांचा उपभोग घ्या” असं विधान कालीचरण बाबा याने नाशिकमधील एका धार्मिक कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी केलं. त्यानंतर महाराष्ट्रभरातून कालीचरण बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. याच मागणीसाठी शुक्रवारी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराश्र्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी “जगातील तमाम सुंदर महिलांचा उपभोग घ्या हे या भोंदू बाबाचे वक्तव्य राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात होणं अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असा विकृतपणा खपवून घेतला जात नाही.” असं विधान प्रशांत जगताप यांनी फॉर द पीपल न्यूजशी बोलताना केले. याशिवाय महाराष्ट्रातील सरकार कालीचरण बाबावर कारवाई का करत नाही असा सवालही प्रशांत जगतापांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून “पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा”, “समाजाला धोका, कालीचरणला ठोका” अशा आशयाच्या घोषणा देत कालीचरण बाबाच्या विधानाचा निषेध व्यक्त केला.