विदर्भ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.पण भाजपने शिवसेनेच्या मदतीने या भागावर आपली पकड मजबूत केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या भागातील ६६ पैकी चाळीसहून अधिक जागा जिंकल्या होत्या. याशिवाय लोकसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळवलं होतं.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपने मुसंडी मारली होती.त्यामुळे विदर्भ काँग्रेसचा समजला जाणारा बालेकिल्ला भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.२०१९ च्या निवडणुकीत विदर्भातल्या १० जागांपैकी ९ जागांवर भाजपने विजय मिळवला होता.पण यावेळी अवघ्या दोन जागांवर भाजपला यश मिळवता आलंय.तर काँग्रेसने मात्र जोरदार कमबॅक केलं आहे.त्यामुळे विदर्भासारख्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव का झाला? भाजपाचे राज्याचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे सर्व दिग्गज नेते विदर्भातले असून देखील विदर्भात भाजपाचे पानिपत का झाले? हेच आपण व्हिडिओतून जाणून घेऊ…
विदर्भात लोकसभेच्या एकूण १० जागा आहेत. यापैकी भाजपने सात जागा लढवल्या होत्या व तीन जागा मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडल्या होत्या. भाजपने लढवलेल्या जागांमध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, अमरावती, वर्धा व अकोला अशा सात जागा होत्या.२०१९ मध्ये अमरावती, चंद्रपूर वगळता सर्व जागा भाजपकडे होत्या. नागपूरमधून पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी, चंद्रपूरमधून विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवले होते. याशिवाय भंडारा-गोंदिया, गडचिरोली, वर्धा येथून विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली होती.अकोल्यात अनुप धोत्रे तर अमरावतीमधून नवनीत राणा यांना संधी देण्यात आली होती. या सात पैकी नागपूर आणि अकोला या दोन जागा वगळता पाच जागांवर भाजपचा पराभव झालाय.नागपुरातून नितीन गडकरी विजयी झाले आहेत. नितीन गडकरींना 6,55,027 इतकी मतं मिळाली आहेत.नितीन गडकरींनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा 1,37,603 इतक्या मतांनी पराभव केला आहे…विकास ठाकरेंना 5,17,424 मतं मिळाली आहेत.तर अकोल्यातून अनुप धोत्रेंनी 4,57 030 इतकी मत घेत काँग्रेसच्या अभय पाटील यांना 40,626 मतांनी पराभूत केलं आहे.अभय पाटलांना 4,16,404 मतं मिळाली आहेत.या दोन जागा सोडल्या तर चंद्रपूर मधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या आहेत. प्रतिभा धानोरकरांनी 7,18,410 इतकी मतं घेत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा 2,60,406 इतक्या मोठ्या मताधिक्यानं पराभव केलाय.. मुनगंटीवारांना 4,58,004 मतं पडली आहेत.गडचिरोलीतुन काँग्रेसचे नामदेव किरसान विजयी झाले आहेत. किरसान यांनी 6,17,792 मत घेत भाजपच्या अशोक नेतेंचा 1,41,696 इतक्या मतांनी पराभव केलाय.अशोक नेतेंना4,76,096 मतं पडली आहेत.भंडारा-गोंदिया तून काँग्रेसचे प्रशांत पडोळे विजयी झाले आहेत..पडोळेंनी 5,87 413 मत घेत भाजपच्या सुनील मेंढेचा 37,380 मतांनी पराभव केलाय.सुनील मेंढेना 5,50,033 मतं मिळाली आहेत..अमरावतीतुन काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत.त्यांनी 5,26,271 मतं घेत भाजपच्या नवनीत राणांना 19,731 मतांनी पराभवाची धूळ चारली आहे..नवनीत राणांना 5,06 540 मतं मिळाली आहेत..आणि वर्ध्यातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे विजयी झाले आहेत अमर काळेंनी 5,33,106 मतं घेत भाजपच्या रामदास तडस यांचा 81,648 मतांनी पराभव केलाय.रामदास तडस यांना 4,51,458 मत मिळाली आहेत.
आता उरलेल्या तीन जागांवर काय झालं ते पाहुयात..यवतमाळ वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख विजयी झाले आहेत. संजय देशमुख यांनी 5,94,807 इतकी मत घेत शिंदेंच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा 94,473मतांनी पराभव केलाय.राजश्री पाटील यांना 5,00,334 मत मिळाली आहेत.. रामटेकमधून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाले आहेत. त्यांना 6,13,025 इतकी मत मिळाली आहेत.बर्वे यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या राजू पारवेंचा 76,768 मतांनी पराभव केलाय..राजू पारवे यांना 5,36,257 मतं मिळाली आहेत…आणि बुलढाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत.त्यांना 3,49,867 मतं मिळाली आहेत.प्रतापराव जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र खेडेकरांना 29,479 मतांनी पराभूत केलं आहे. नरेंद्र खेडेकर यांना 3,20 388 मतं मिळाली आहेत.एकंदरीत हा निकाल पाहिला तर भाजपाच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने सुरुंग लावला आहे.एकट्या काँग्रेसने १० पैकी पाच जागा जिंकल्या आहेत तर महाविकास आघाडीचा विचार करता १० पैकी सात उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत.भारतीय जनता पार्टीची केंद्रात व राज्यात सत्ता, राज्याचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे सर्व दिग्गज नेते विदर्भातले असून देखील विदर्भात भाजपाचे पानिपत का झाले हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.याबरोबरच पक्षाचं भक्कम पाठबळ, निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व असताना भाजपला विदर्भात अपयश आलंय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.भाजपमध्ये प्रत्येक जिल्ह्यात नेत्यांमध्ये मतभेद आहेत. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असून त्यांना महत्त्व दिलं जात नाही, निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही, त्यामुळे अनेकांनी यावेळी निवडणुकीत फक्त दिसण्यापुरतच काम केलं का हा सवाल या निकालातून उपस्थित होतो.उमेदवारी देतानाही चुका झाल्या. चंद्रपूरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती, पण त्यांना रिंगणात उतरवण्यात आले. अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा परिणाम या दोन्ही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या.तसेच ऐन निवडणुकीच्या काळात सोयाबीन आणि कापसाचे भाव पडले. त्यामुळे शेतकरी कमालीचा नाराज होता. ही नाराजी दिसूनही महायुतीकडून फारशी हालचाल झाली नाही. पंतप्रधान मोदी हाच प्रचारातील प्रमुख मुद्दा होता.त्यामुळे बाकी काही करायची आवश्यकता नाही असा भ्रम कार्यकर्त्यात निर्माण झाला. प्रत्यक्षात ज्या तीन ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या तिथे पक्षाला पराभव स्विकारावा लागला. भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडी विदर्भात एकसंघ होती. कुठेही मोठी बंडखोरी नव्हती.विदर्भात यावेळी काँग्रेसच्या बाजूने सुप्त लाट होती. त्यामुळे ‘डमी उमेदवार’ अशी ओळख निर्माण झालेले प्रशांत पडोळेसुद्धा भंडारा-गोंदियातून निवडून आले. ओबीसी, दलित, आदिवासी, मुस्लीम ही मते विदर्भात नेहमीच निर्णायक ठरतात. यावेळी हा वर्ग एकगठ्ठा महाविकास आघाडीकडे वळला. त्यामुळे पुन्हा एकदा विदर्भ हा काँग्रेसचा गड असं चित्र या निकालातून निर्माण झालं आहे.