या लोकसभा निवडणुकीत देशात NDA चे जास्त खासदार निवडून आले पण महाराष्ट्रात NDA ची अर्थात महायुतीची चांगलीच पीछेहाट झाली. २०१९ ला महायुतीचे ४१ खासदार निवडून आले होते पण यावेळी केवळ शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीला सोबत घेऊन देखील फक्त १७ जागांवर विजय मिळवता आला आहे.. महाविकास आघाडीने महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला आहे..महायुतीच्या बहुतांश उमेदवारांचा पराभव होण्यामागे महत्वाचं कारण हे मनोज जरांगे फॅक्टर असल्याचं मानलं जातं..विशेषतः मराठवाड्यात जरांगे फॅक्टरच चालल्याचं प्रकर्षांने दिसून आलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसले.त्यावरून सिद्ध झालं की मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरची जादू चालली. पण आता अगदी तोंडावरच विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली असताना असाच प्रकार विधानसभेच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळू शकतो का? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात.
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठवाडा धुमसत होता. मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा महायुती सरकारने काढला नाही, अशी समाजाची भावना आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठा समाजाने आपली ताकद लोकसभा निवडणुकीत दाखवून दिली…मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमधून सुरुवात केली. अंतरवली सराटीत त्यांनी उपोषण केले. त्यांच्या उपोषणस्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. जरांगे पाटील यांनी राज्यभर ठिकठिकाणी सभा घेत एकच रान उठवलं…सरकारकडून त्यांना आश्वासनं देण्यात आली पण या प्रकरणातील कायदेशीर बाबी पाहता त्याची पूर्तता होणं शक्य झालं नाही..जरांगे पाटील यांची सगेसोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला. मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याची चर्चा आहे. मराठवाड्यातील एक राखीव जागा वगळता दोन जागांवर महायुती आणि मविआमध्ये ‘मराठा विरुद्ध ओबीसी’, चार जागांवर ‘मराठा विरुद्ध मराठा’ अशी लढत झाली. बीड आणि परभणी या मतदारसंघांत ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ असे स्पष्ट ध्रुवीकरण दिसून आले. मराठवाड्याशिवाय सोलापूर, माढा आणि अहमदनगर या मतदारसंघांत मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता. लातूर व सोलापूर या राखीव मतदारसंघांतही आरक्षणाचा मुद्दा होता. विदर्भात मराठा आरक्षणाचा मुद्दा नसला तरी काही मतदारसंघांत ‘कुणबी-मराठा विरुद्ध ओबीसी’ अशा लढतीमुळे जातीय ध्रुवीकरण घडून आले. मराठा आरक्षणाचा विचार करून मराठवाड्यात मविआने लातूर व छत्रपती संभाजीनगर वगळता सर्वच उमेदवार मराठा समाजातून दिले. मविआने मराठवाड्यात एकही ओबीसी उमेदवार दिला नव्हता तर महायुतीने मराठवाड्यात दोन ओबीसी उमेदवार दिले. पश्चिम महाराष्ट्रात मराठा जातीचा प्रभाव लक्षात घेऊन महायुतीने दोन राखीव जागा वगळता 10 जागांवर मराठा उमेदवार दिले. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने एकही ओबीसी उमेदवार दिला नाही तर मविआने दोन ओबीसी आणि आठ मराठा उमेदवार दिले होते. मराठा क्रांती मोर्चा आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन या माध्यमातून आरक्षणाची मागणी पुढे आल्यानंतर राज्यात मराठा व ओबीसी यांच्यातील परस्परसंबंध निश्चितपणे ताणले गेले आहेत.
या निवडणुकीतील प्रचारामुळे या तणावात भरच घातली. बीडमधील काही गावांमध्ये मतदानानंतर मराठा व वंजारी समाजाने एकमेकांच्या दैनंदिन व्यवहार, बाजारावर बहिष्कार टाकण्याची उदाहरणे समोर आली. निकालानंतरही काही गावात तणाव निर्माण झाला. मनोज जरांगे पाटील यांनी ते कुणालाही समर्थन देणार नसल्याचं वेळोवेळी स्पष्ट केलं होतं. तरी मराठवाड्यात राहणाऱ्या मराठा समाजातील लोकांना जरांगे पाटील काय म्हणतात हे ऐकायचं होतं.अशाच एका भाषणात जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला निवडणुकीत असं पाडा की त्याच्या पुढच्या पिढ्यांनी निवडणूक लढवण्याचा विचारही केला नाही पाहिजे.” हे विधान करताना त्यांनी कुणाचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोष कुणाकडे आहे याबाबत मराठा मतदारांनी अंदाज लावला आणि त्यानुसार कृती केल्यामुळे परभणी, बीड, धाराशिवसह इतरही मतदारसंघात ‘जरांगे पाटील फॅक्टर’ चालला असं दिसतंय. जरांगे फॅक्टरमुळे सगळ्यात जास्त फटका बसलेला मतदारसंघ म्हणजे बीड. अत्यंत अटीतटीच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा फक्त 6,553 मतांनी पराभव केला. जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवेंचा काँग्रेसच्या कल्याण काळेंनी दारुण पराभव केला.अनेक ठिकाणी मराठा आरक्षण मुद्याचा परिणाम दिसून आला..एकूणच लोकसभेला मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका बसल्याची कबुली त्यांच्याच नेत्यांनी दिली आहे. मराठा आंदोलनामुळे यावेळी प्रथमच विक्रमी संख्येने म्हणजे २६ मराठा खासदार निवडून आले आहेत. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांचा विचार पाहता हे प्रमाण ६० टक्के इतकं आहे. लोकसभेत प्रथमच एवढ्या मोठ्या विक्रमी संख्येने गेलेले मराठा खासदार हे निश्चितच मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं यश म्हणावं लागेल. मराठा समाज एकवटलेला असाच राहिल्यास विधानसभा निवडणुकीतही मराठा समाजाचे आमदार विक्रमी संख्येने निवडून जाण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेतील यशामुळे हुरूप वाढलेल्या जरांगेंनी आता महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेला नाव घेऊन मराठा आरक्षण विरोधकांना पाडणार असल्याचं स्पष्ट विधान केलं आहे..या मुद्याचा मोठा फटका बसलेली महायुती आधीच बॅकफूटवर गेली आहे. पण विधानसभा निवडणुकीला काही अवधी अजून बाकी आहे त्या आधी महायुतीला यावर काही ठोस उपाय शोधावा लागणार आहे..अन्यथा विधानसभेलाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.