अजित पवार यांच्या बंडाला आता जवळपास एक वर्ष होत आलं आहे.या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ झाली आहे.अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यापासून फारकत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला.संख्याबळ दाखवून पक्षावर दावा ठोकला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आपल्याकडे खेचण्यात यश मिळवत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवली.पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने मात्र आमदारांचं संख्याबळ सोबत असलं तरी जनता सोबत नसल्यावर काय परिणाम होतो हे दाखवून दिलं.अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत आले उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले, सोबत आलेल्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं.अजित पवारांना 40 आमदार आपल्याकडे वळवता आले पण या निवडणुकीतून जनता आपल्या सोबत आहे हे सिद्ध करता आलं का ? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त चार जागा आल्या होत्या.बारामती, शिरूर, रायगड आणि धाराशिव.तर राष्ट्रवादीच्या कोट्यातली पाचवी जागा परभणीची जागा रासपला सोडण्यात आली होती.या लढवलेल्या चार जागांपैकी रायगडची जागा वगळता इतर तिन्ही जागांवर अजित पवारांचे उमेदवार पराभूत झाले. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना आपल्या बालेकिल्ल्यात देखील पराभूत व्हावं लागलं. सुप्रिया सुळेंनी त्यांचा 1 लाख 58 हजार 333 इतक्या मताधिक्याने पराभव केला.अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी दिवसरात्र एक केलं, ठिकठिकाणी सभा घेतल्या, गाव न गाव पिंजून काढलं. पण यश मात्र आलं नाही.शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील पवार काका विरुद्ध पुतण्या असा जंगी सामना पाहायला मिळाला. पक्षात पडलेल्या फुटीनंतर आधी द्विधा मनस्थितीत असलेल्या खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शेवटी शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय अजित पवार यांना रुचला नाही. म्हणून त्यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष दिलं. कोल्हेंना जमेल तितका विरोध केला, त्यांच्यावर सडकून टीका केली. हा मतदार संघ जागावाटपात शिवसेनेला न मिळाल्यानं शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढले. 2019 साली अजित पवारांनी कोल्हेंना प्रथम संधी दिली. तेव्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असाच सामना झाला होता. मागच्या वेळी ज्यांचा विरोध केला त्यांनाच घडाळ्याच्या चिन्हावर लढायला लावलं आणि त्यांचा प्रचार केला.पण अमोल कोल्हेनी 1 लाख 40 हजार 951 मतांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केले.यात विशेष म्हणजे अमोल कोल्हे दोन्ही वेळेस भरघोस मतांनी निवडून आले. पण यावेळी कोल्हेंना शरद पवार यांना मिळालेल्या सहानुभूतीचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.आणि शिरूरच्या जनेतने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नाकारलं.