पुन्हा मतमोजणीसाठी भरले १८ लाख
महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांमधल्या हाय व्होल्टेज झालेल्या लढतींमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा समावेश होता. कारण इथं नगर जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक दशकं मोठा दबदबा टिकवून असलेल्या विखे पाटील घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती.पण या प्रतिष्ठेच्या लढाईत लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंकेंनी भाजपच्या डॉ सुजय विखेंचा पराभव केला.२०१९ च्या निवडणुकीत सुजय विखे विजयी झाले होते पण यावेळी त्यांना हार पत्करावी लागली.हा पराभव सुजय विखेंना चांगलाच जिव्हारी लागला आहे.सुजय विखेंनी आता थेट ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनवर शंका उपस्थित करत पुन्हा मतमोजणीची मागणी केली आहे.यासाठी त्यांनी तब्बल १८ लाख रुपये भरले असल्याची माहिती समोर आली आहे.यानिमित्तानं नगर दक्षिणमध्ये नेमकं काय घडतंय?.हेच आपण या व्हिडिओतून पाहुयात.
नगर दक्षिणचा निकाल फारच लक्षवेधी ठरला.सुमारे ३२ वर्षांनंतर विखे कुटुंबातील सदस्य डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. प्रस्थापित राजकीय घराण्यातील माणसाला धूळ चारत सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंकेंनी विजयाची तुतारी वाजवली.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले निलेश लंके प्रस्थापित घराण्याला फाईट देत जायंट किलर ठरले… सुजय विखे पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या होत्या तर निलेश लंके यांच्यासाठी शरद पवार यांनी आठ सभा घेतल्या होत्या. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही लंकेच्या विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे विखे विरुद्ध लंके हा सामना अत्यंत प्रतिष्ठेचा झाला. या प्रतिष्ठेच्या लढाईत निलेश लंकेंनी 28,929 मतांनी सुजय विखेंना पराभूत केलं.या निवडणुकीत निलेश लंकेंना 6,24,797 मतं मिळाली तर सुजय विखेंना 5,95,868 मतं मिळाली..या पराभवाचा सुजय विखेंना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे…निकालानंतर पराभवामुळे त्यांचे कार्यकर्ते अश्रू ढाळतानाचे व्हिडिओ समोर आले होते. या सर्व घडामोडीनंतर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वर शंका उपस्थित केली आहे.त्यांनी 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी विखेंनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्क देखील भरले असल्याची माहिती समोर आली आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी 10 जून रोजी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र याबाबत सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. पण निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे. तिथून हा प्रस्ताव देशाच्या निवडणूक आयोगाकडे जाईल. ४५ दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली, तर न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होणार आहे. जर कोणी न्यायालयात गेलं नाही तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होईल.