‘पंढरीची पायी वारी, ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही।
पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी॥’
या अभंगांच्या ओळी सार्थकी ठरवत दरवर्षी महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी पंढरपूराच्या दिशेने प्रस्थान करत असतात.जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेले हे वारकरी पुण्यात दोन दिवस मुक्कामी असतात. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यनगरीत माऊली आणि तुकोबांच्या पालखीसह आलेल्या वारकऱ्यांचं यथोचित आदरातिथ्य केलं जातं.ही पुण्यातली वारी आणि वारीतलं पुणं नेमकं कसं असतं या संदर्भात फॉर द पीपल न्यूजनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट…
पुण्यात आल्यानंतर जगतगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी विसाव्यासाठी नाना पेठेतील निवडुंग विठोबा मंदिरात मुक्कामी असते.तुकोबांची पालखी या ठिकाणी विसावा घेत असते यामागे मोठा इतिहास आहे.ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळी पंढरीच्या दिशेनं पायी निघाले होते.त्यावेळी त्यांनी पुण्यातील भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्काम केला होता.याच घटनेमुळं भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विसावा घेत असते.या मंदिराला पालखी विठ्ठल मंदिर म्हणूनही ओळखलं जातं.या पालख्या आणि त्यांच्यासह अनेक वारकरी ज्यावेळी पुण्यात येत असताता त्यावेळी विविध व्यक्ती किंवा संस्थांच्या माध्यमातून या वारी सोहळ्यात मोफत औषधोपचार दिले जातात. तर अनेकजण विविध पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा करत असतात.यामध्ये अनेक न्हावी बांधव वारकऱ्यांची केसं कापून देतात.अनेक चर्मकार बांधव पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या चपला शिवून देण्याचं काम करतात.या वारीसोहळ्यात हिंदू-मुस्लिमांमधील बंधूभावही आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.असेच एक मुस्लिम समाजातील अब्दुल चाचा गेली 30 वर्ष सातत्यानं या वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगाची मालिश करून देण्याचं सेवाभावी कार्य करत आहेत.