लोकसभा निवडणुकीत अवघ्या एका जागेवर यश मिळवण्यात आल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार बॅकफूटवर गेले आहेत.पण पराभवाने खचून न जाता अजित पवार आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरु केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील अजित पवार यांच्या पक्षाची सुमार कामगिरी पाहता महायुतीमधील जागावाटपात त्यांच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. वास्तवाचं भान ठेवत अजित पवारांनी देखील विधानसभेला कमी जागा लढवण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जात आहे. पण खरंच अजित पवार जागावाटपात किती माघार घेणार? तडजोड केलीच तर अटी काय असू शकतात? यासंदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत अजित पवार एकाकी पडल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिंदे सेनेच्या काही नेत्यांनी लोकसभेतील पराभवासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी भाजप अजित पवारांची साथ सोडणार का? याची चर्चा सुरु झाली. पण भाजपच्या राज्यातील नेतृत्त्वानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतची युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं विधानसभा निवडणूक होईपर्यंत तरी ही युती कायम असेल. अजित पवारांचा लोकसभेत भाजपला काय उपयोग झाला, उलट नुकसानच झालं, अशी मांडणी भाजपचे अनेक पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. भाजपचे पदाधिकारी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल उघड भूमिका घेऊ लागले आहेत. पुणे, सातारा, परभणी, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा फायदा झाला नाहीच. उलट महायुतीला तोटाच झाला, असा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात अजित पवारांसोबतची युती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली.तसेच राज्यातील भाजपचं नेतृत्त्व आणि अजित पवारांमध्ये देखील एक बैठक झाली. त्यात अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीला २८८ पैकी ६५ ते ७० जागांवर समाधान मानण्याची तयारी दर्शवली आहे.अशी माहिती समोर आली.अजित पवार विधानसभेच्या जागावाटपात बॅकफूटला गेल्यास भाजप, शिंदेसेना आणि मित्रपक्षांना २१८ ते २२३ जागा लढवता येतील. शिंदेसेना १०० जागांसाठी आग्रही आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे १०५ उमेदवार निवडून आले होते. सध्या भाजपचे राज्यात १०३ आमदार आहेत. तर शिवसेनेचे ४० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ आमदार आहेत. जागावाटपात अजित पवार लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास तयार असल्याचं भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं. हा नेता जागावाटपाच्या चर्चेत सहभागी होता. अजित पवार कमी जागा स्वीकारण्यास तयार आहेत. विधानसभेनंतर महायुतीची सत्ता आल्यास मला उपमुख्यमंत्रिपदी कायम ठेवा, अर्थमंत्रीपद द्या. आम्ही जागांवर तडजोड करतो अशा अटी अजित पवारांनी घातल्या आहेत, असं भाजपच्या नेत्यानं म्हटलंय. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी ९६ जागा लढवण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे.मुंबई, कोकण, मराठवाड्यात ठाकरे सेना अधिक जागा लढवेल. तर काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा लढवेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात महायुती विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढवेल. त्यामुळे विधानसभेनंतरही भाजपच महायुतीतला मोठा भाऊ राहण्याची शक्यता आहे. मात्र अजित पवार यांना तडजोड करावी लागू शकते.