राज्यात आषाढी वारीला ३० तारखेपासून सुरुवात झाली असून, संपूर्ण वारकरी संप्रदाय हा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. येत्या 17 जुलै ला आषाढी एकादशी आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक राजकीय नेते मंडळीही वारीमध्ये सहभागी होत आहेत. राज्यातील काँगेसच्या नेत्यांकडून राहुल गांधींना वारीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे राहुल गांधीही यावर्षी वारीमध्ये सहभागी होतील अशी चर्चा सुरु होती. आळंदी-देहू ते पंढरपूर अशी पायी वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळं काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील वारीमध्ये सहभागी होणार असल्याच सांगितलं आहे. यापूर्वी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हजारो किलोमीटरचा पायी प्रवास केल्यामुळे वारीमध्ये चालणे त्यांचासाठी सहजसोपी गोष्ट ठरू शकते.
या तारखेला होतील सहभागी
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे 13 किंवा 14 जुलै ला आषाढी वारीमध्ये सहभागी होतील अशी चर्चा सुरु होती. राहुल गांधी वारीमध्ये सहभागी व्हावे यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना निमंत्रण दिलेलं ते राहुल गांधींनी स्वीकारले असून, राहुल गांधी पहिल्यांदाच वारी मध्ये सहभागी होणार आहेत. आणि येत्या 14 जुलैला ते वारीमध्ये सहभागी होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचा पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या या दौऱ्याला आता चांगलेच महत्व आले आहे.
आगामी विधानसभेसाठी होऊ शकतो फायदा
यापूर्वी, राहुल गांधींनी 7 सप्टेंबर 2022 ला भारत जोडो यात्रा केली. राहुल गांधी यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला एकत्र घेऊन भारताच्या दक्षिणेकडून म्हणजेच कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीरच्या श्रीनगर पर्यंत चालत हि यात्रा केली होती. ज्याचा मोठा परिणाम हा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात पहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर, आषाढी वारीमध्ये राहुल गांधीनी सहभाग नोंदवल्याने त्याचा फायदा येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १३ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. आता जर राहुल गांधी हे 14 जुलै ला वारीमध्ये सहभागी झाले तर, असंख्य जनसमुदायाच्या भेटी घेता येतील आणि याचा फायदा काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ शकतो. आता राहुल गांधींच्या या दौऱ्याचे महाराष्ट्र कॉंग्रेसकडून कसे नियोजन केले जाईल, याची सर्वाना उत्सुकता लागली आहे.