विधिमंडळात नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात निधी आणि योजनांची घोषणा करण्यात आली. तसेच सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी वाटप देखील केला जातोय. यामध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षांच्या आमदारांची लॉटरी लागल्याचं दिसून येतंय. अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर जे आमदार अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडले त्यांच्यावर निधीवाटपादरम्यान जास्त लक्ष देण्यात आले आहे. अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे असल्याने या गोष्टीचा फायदा त्यांच्या पक्षातील आमदारांना जास्त झाल्याचे पाहायला मिळते.
देवळाली मतदारसंघातील विविध कामे बऱ्याच काळापासून प्रलंबित होती. गेली तीन चार वर्षे पाठपुरावा करूनही त्याला शासनाची मंजुरी मिळत नव्हती. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या कामांना निधी मिळावा म्हणून आमदार अहिरे ह्या अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सतत मागणी करत होत्या. त्यांची मागणी मान्य करून पावणे तीनशे कोटी रुपयांचा निधी देवळाली मतदारसंघासाठी मंजूर करण्यात आलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये सय्यद पिंपरी ते शिंदे गाव या रस्त्यासाठी १७४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मतदारसंघातील शिंदे गावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी ३५ कोटी रुपये मंजूर झाले असून गिरणारे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच येवला विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघासाठी देखील निधी मंजूर करण्यात आलाय. येवला मतदारसंघातील रस्त्यांसाठी २३.५१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः रस्ते पूल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या निवास स्थानाच्या कामांचा समावेश आहे. यामध्ये निफाड तालुक्यातील लासलगाव पाटोदा हा रस्ता आणि पुल तसेच गाजरवाडी ते नांदूर मधमेश्वर ग्रामीण महामार्गावरील पुलासह रस्त्याच्या कामांचा समावेश असल्याने तालुक्यातील राज्यमार्ग क्रमांक ८ ते नांदेसर आडगाव हा प्रमुख रस्ता यामध्ये आहे. जिल्हा मार्ग क्रमांक ८० या रस्त्याच्या सुधारणेसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अनकाई,कुसमाडी,नगरसुल,अंदरसुल,पिंपळगाव,जलाल रोड ते राज्य महामार्ग ४५१ या रस्त्याच्या सुधारणासाठी ५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे मतदारसंघातील विकास कामांचे बऱ्याच वर्षांपासूनचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. मतदारसंघातील विकास कामांमुळे अजित पवार गटाला विधानसभेत फायदा होईल असे दिसून येते.