विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान सुरु झाले असून १२ उमेदवार रिंगणात आहेत. हि निवडणुक गुप्त पद्धतीने होत आहे. यामध्ये क्रॉस वोटिंगचा धोका जास्त आहे. क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून हॉटेल पॉलिटिक्सचा जोर वाढला होता. राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांनां हॉटेल्सवर ठेवलं होत यामध्ये भाजपाचे आमदार कुलाब्याच्या ताज प्रेसिडन्सीमध्ये होते तर शिवसेनेचे आमदार हे बांद्राच्या ताज लँड्समध्ये होते. उद्धव ठाकरेंचे आमदार हे परळच्या आयटीसी ग्रँड मराठा हॉटेल मध्ये होते. राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनां अंधेरीच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. हे आमदार हॉटेलवरून थेट विधान भवनाकडे जाणार आहेत. सुरुवातीला भाजपाचे आमदार मतदान करतील त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार मतदान करणार आहेत. क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मतदान करण्यासाठी नवाब मलिक हे विधानभवनात पोहोचले आहेत. काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली या बैठकीला नवाब मलिक देखील उपस्थित होते. मलिकांनी शरद पवार, जयंत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यामुळे नवाब मलिक हे अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करणार की शरद पवारांच्या उमेदवाराला मतदान करणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक पक्षाला एका एका मतांसाठी संघर्ष करावा लागतोय. यातच आता भाजपाने एक नवीन खेळी खेळलीय. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड हे भाजपाचे आमदार असून ते तुरुंगात होते पण त्यांना निवडणुकीसाठी तुरुंगाबाहेर आणलं असून यावरुन राजकारण तापले आहे. विरोधकांनी यावर तीव्र विरोध केलाय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याला विरोध केला आहे. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. न्याय व्यवस्थेवर आपण बोलू शकत नाही. गणपत गायकवाड यांनी स्वतः गोळी झाडली हे सगळ्यांनी पाहिलं. निवडणूक आयोग बायस आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.निवडणूक आयोग त्यांच्या घराचा गडी आहे, हा तर सत्तेचा गैरवापर केला जात आहे. उघड्या डोळ्याने हे सगळे पाहत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आम्ही आक्षेप नोंदवला असल्याचं आंबादास दानवे यांनी सांगितलं.
तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील विरोध दर्शविला आहे. माझ्यावर खोटे आरोप करून मला जेल मध्ये टाकलं होत. त्यावेळी विधान परिषद निवडणुकीसाठी मी मतदानाची परवानगी मागितली पण मला परवानगी मिळाली नाही. आश्चर्याची गोष्ट आहे गणपत गायकवाड यांच्या साठी वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं चित्र आहे. भाजपचा लोअर कोर्टवर दबाव असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.