महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी १५ जुलैला शरद पवार यांची मुंबईतल्या सिल्व्हर ओकवर भेट घेतली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी १६ जुलैला अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील शरद पवार यांच्या मोदीबागेत उपस्थित होत्या. मोदीबागेत सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याचे अजूनही स्पष्ट झाले नाही.
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली. पक्षफुटीमुळे तसेच लोकसभा निवडणुकीमुळे अजित पवार विरुद्ध संपूर्ण पवार कुटुंब असा संघर्ष देखील पाहायला मिळाला. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांच्या सख्या भावाने देखील त्यांच्या विरोधात प्रचार केला. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा १ लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार ह्या पुण्यातील शरद पवार यांच्या मोदीबागेत उपस्थित होत्या . यावेळी मोदीबागेत शरद पवार तसेच सुप्रिया देखील उपस्थित असल्याचं बोललं जात आहे. मोदीबागेत सुमारे तासभर सुनेत्रा पवार थांबल्या होत्या. परंतु सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची भेट झाली कि नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. १५ जुलैला छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यांनतर लगेच आज १६ जुलैला सुनेत्रा सुनेत्रा पुण्यातील शरद पवार यांच्या मोदीबागेत उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.