आज पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मावळला सर्वाधिक निधी का दिला जातो? असा मुद्दा उपस्थित करत सवाल केला. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मावळचे आमदार सुनील शेळके संतापले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून आमचा सर्वांचा डीपीडीसीचा अनुभव चांगला राहिलेला आहे. पहिल्यादांच असं झालंय. आम्ही यामध्ये श्रीरंग बारणे यांचंही मार्गदर्शन घेतलं. कदाचित असंही होतं असेल की, माझ्याकडून आणि अमोल कोल्हेंकडून काही कमतरता राहत असतील. त्यामुळे श्रीरंग बारणेंना जास्त झुकतं मापं दिलं जातं. त्यामुळे आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आणखी निधी मतदारसंघात कसा आणायचा हे देखील सांगा म्हटलं.
दरम्यान, बैठकीतून बाहेर पडल्यानंतर सुनील शेळकेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “इतर तालुक्यांना देखील निधी मिळावा, अशी आमची देखील भावना आहे. परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण कोणताही खोडा घालू नये, अशी माझी विनंती आहे. असं सुनील शेळके म्हणाले.यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुनील शेळकेंनी माझं पूर्ण ऐकलं नाही. मी असं म्हटले की, मावळला निधी दिला. त्याबद्दल आमचे आभार आहेत. कारण मावळ हा जिल्ह्याचा आणि मतदारसंघातील महत्वाचा तालुका आहे. जो न्याय तुम्ही मावळला देता तोच न्याय तुम्ही बारामती आणि शिरुरला द्या, एवढीच आमची अपेक्षा होती, पण सुनील शेळके नाराज झाले. ते म्हणाले, आत्तापर्यंत बारामतीला खूप दिलंय. तेव्हा आम्ही कुठे बोललो? त्याच्यावर मला उत्तर देण मला फारसं महत्वाचं वाटत नाही. मी राजकारण आणि वैयक्तिक संबंध नेहमीच वेगळे ठेवलेले आहेत. ही लोकशाही आहे. सर्वांशी लढाई ही वैचारीक आहे. वैयक्तिक नाही. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.