कोल्हापूर | कोल्हापुराला महापुराचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. कारण पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी ओलांडली आहे. आज सकाळीच पंचगंगेने आपली धोका पातळी ओलांडली. त्यामुळे पुराचं पाणी आता शहरात शिरू लागले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण १०० टक्के भरले आहे. राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले असून तब्बल ७२१२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे यंत्रणादेखील अलर्ट झाली असून ज्या भागात पुराच्या पाण्याचा शिरकाव होतो त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहेत. तर अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.खरंतर कोल्हापूर जिल्ह्यात
गेल्या आठवड्याभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
परिणामी जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पंचगंगा नदीने सोमवारी २२ जुलै रोजी आपली इशारा पातळी गाठून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली होती. पंचगंगेने आज सकाळी ८ च्या सुमारास आपली धोका पातळी ओलांडली असून सध्या पंचगंगा ४३ फूट २ इंचावरून वाहत आहे. आज सकाळी आठच्या सुमारास राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ४३ टक्के इतकी होती तर जिल्ह्यातील तब्बल ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून कोल्हापूरकर पुन्हा एकदा चिंतेत पडले असून जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.शहरात बुधवारी दिवसभर पावसाची ये-जा सुरू होती. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम होता. यामुळे राधानगरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी राधानगरी धरण देखील १०० टक्के भरले असून राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले असून स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३, ४ , ५ आणि ६ मधून ५७१२ क्युसेक्स तर पॉवर हाऊस मधून १५०० असे एकूण ७२१२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.तसेच खबरदारी म्हणून कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून देखील बुधवारी सायंकाळी २ लाख ५० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला असून कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेऊन अलमट्टी धरणातून आणखी पाण्याचा विसर्ग वाढवावा, यासाठी निवेदन दिले आहे. यामुळे काही काळ कोल्हापूर आणि सांगलीकरांना दिलासा मिळू शकतो.