बीडः लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. 26 जुलै ला पंकजा मुंडे यांचा वाढदिवस असतो. आणि यानिमित्त शुभेच्छा देताना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री व संघर्ष कन्या’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आता सुरू झाल्या आहेत.याआधी, 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांकडून केक आणण्यात आला आणि त्यावर ‘मी अजित आशा अनंतराव पवार’ या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता. त्यावरून संपूर्ण राज्यभर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा झाल्या. त्यात आता पंकजा मुंडेंच्या ‘भावी मुख्यमंत्री व संघर्ष कन्या’ नावाने बॅनर लावल्याने राज्यात चर्चांना उधाण आलंय.
महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, पंकजा मुंडे यांचा निवडणुकीत पराभव झाला. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी झाले. दरम्यान, पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या 3 कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर भाजपकडून पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेण्यात आले.
पंकजा मुंडेंकडून कार्यकर्त्यांना आवाहन
26 जुलै ला पंकजा मुंडे यांचा वाढदिवस असतो. प्रत्येकवर्षी पंकजा मुंडेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात केला जातो. परंतु, समर्थकांच्या आत्महत्यांमुळे पंकजा मुंडे यावेळी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच कार्यकर्त्यांना याबाबत आवाहनही केले. परंतु, बुलढाण्यात पंकजा मुंडेंच्या काही उत्साही कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आले ज्यावर ‘भावी मुख्यमंत्री व संघर्ष कन्या’ असे लिहिण्यात आले. आता त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात.