“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नाट्यकलेविषयी पत्रकारांना माहिती दिली. अजित पवार किमान १० ते १२ वेळा दिल्लीतून वेश बदलून आले. फक्त वेश बदलून नाही तर ते बनावट नाव वापरून आले. आता कोणी म्हणतं ते एपी अनंत या नावाने आले, तर कोणी म्हणतं ते ए.पवार नावाने आले. त्यांनी मिशा लावल्या होत्या, टोप्या घातल्या होत्या, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. विष्णुदास भावे यांनी रंगभूमीची स्थापना केली. त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झाले आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे आणि अमित शाह यांना भेटायचे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, “प्रश्न हा आहे की, विमानतळाची सुरक्षा किती खोकली आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. कोणताही माणूस बनावट नावाने, वेश बदलून आपल्या स्वार्थासाठी दिल्ली आणि मुंबई सारख्या विमानतळावरून प्रवास करु शकतो. एवढंच नाही तर तो व्यक्ती देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो. याचा अर्थ देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ झाला आहे. यामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांचाही सहभागी आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला. राऊत पुढे म्हणाले, “माझ्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याआधी वेश बदलून भेटत होते. एकनाथ शिंदे हे जेव्हा-जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले होते. एकनाथ शिंदे हे नाव बदलून मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले असल्याची माहिती माझ्याकडे आहे. दे देखील अमित शाह यांना भेटले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नाव बदलून आणि वेश बदलून गृहमंत्री अमित शाह यांना भेटतात. मात्र, त्यांना कोणीही विमानतळावर आडवत नाही. याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलं आहे. कारण तसं त्यांना विमानतळावरून सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांनी वापरलेले बोर्डींग तपासलं पाहिजे. तसेच त्यांच्याकडून हे ओळखपत्र जप्त केली पाहिजेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.