उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे बिबटे आणि मानव यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबट्यांना इतरत्र उभयारण्यात सोडण्याची मागणी होत होती. त्यामुळे ३१ जुलै रोजी पहिल्या टप्प्यात १० बिबटे गुजरातला रवाना झाले आहेत. जुन्नर वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० बिबटे गुजरातमधील जामनगरच्या अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा प्राणी संग्रहालया’त स्थलांतरित करण्यात आले आहेत. जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील ‘वनतारा प्राणीसंग्रहालया’त जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून ४ मादी व ६ नर असे एकूण १० बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार बिबटे गुजरातमध्ये दाखल झाले आहेत.
जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे गुजरातच्या तीन ॲंम्ब्युलन्स ३१ ऑगस्ट रोजी सकाळी पोहचल्या. सोबत गुजरात येथील झु मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व २३ मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहचले व माणिकडोह व वनविभाग जुन्नर चे १५ अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने लगेचच दिवसभरात १० बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात आले. जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक अमित भिसे, प्रदीप चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे १० बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दखल घेऊन सोडण्यात आले. गुजरातच्या जामनगरला बिबट्यांची सुखरूप पाठवणी करण्यात आली आहे. बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह २० ते २५ जणांचे गुजरातचे पथक ॲंम्ब्युलन्ससोबत होते. हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय ॲंम्ब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षितपणे ॲंम्ब्युलन्समध्ये चढवले गेले. जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्या ॲंम्ब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास वा अन्य समस्या उद्भवल्यास ‘ब्रेकडाउन व्हॅन’ ही दिमतीला देण्यात आली होती. पाठवणी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ॲंम्ब्युलन्समध्ये दाखल करण्यात आले होते. जुन्नर वन विभागाने मानव -बिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. तालुक्यातील नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण तालुक्यात सर्वत्रच बिबट्यांची मोठया प्रमाणावर दहशत माजली आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अधिक बिबटे इतरत्र रवाना केल्यास जुन्नरकरांना अधिक दिलासा मिळू शकतो.