पुणे । देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करुन भाजप पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेची मोट पुन्हा नव्याने बांधायची असल्याचे फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. त्यासाठी मला राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, अशी विनंती फडणवीसांनी केली होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना आता थेट दिल्लीतच बोलावून घेण्याची योजना आखल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाऊ शकते. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. या सर्व चर्चांवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
‘देवेंद्र फडणवीस जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आम्हा सर्वांना आनंद आहे. त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण आहेत’, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणले, बऱ्याच बातम्या मला माध्यमांकडूनच कळतात. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर आम्हा सर्वांना आनंद आहे त्यांच्यात ते सर्व गुण आहेत.भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नुकतीच त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परंतु, केवळ भेट घेण्यामुळं ही चर्चा सुरु नाही. तर, त्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये सर्वात प्रमुख कारण म्हणजे राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा आरक्षण लढ्यामुळं मराठ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. विशेषकरून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ती जास्त आहे. गेल्या अनेक महिन्यांत दररोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस आहेत. लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसला. आणि विधानसभा निवडणुकीतही भाजपाला फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणं पक्षाच्या हिताचं नाही असा एक सूर पक्षांतर्गत देखील सुरु आहे. हे झालं एक कारण. परंतु, राष्ट्रीय स्तरावर पाहायचं झालं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांशी फडणवीसांचे संबंध चांगले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्यानं संघाच्या शीर्ष नेतृत्वाशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आणि ही बाजु फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करू शकते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.