लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. प्रत्येक पक्ष जोमाने तयारीला लागला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेकडून या सर्वच पक्षांकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरु झाली आहे. अशात विधानसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजू शकतं, याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. आता या धामधुमीत येत्या सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांची घोषणा करून निवडणूक प्रक्रिया सुरु करता येईल का, याची चाचपणी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, नवीन सरकारची स्थापना ही 10 ऑक्टोबर 2024 पूर्वी करता येईल का, याची सुद्धा चाचपणी केली जात आहे.
महायुतीच्या नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल सुरु असलेल्या घडामोडींची माहिती मिळताच अनेक मंत्र्यांनी आपआपले मतदारसंघ गाठले आहेत. अनेक आमदार हे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर काही मतदारसंघात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. त्यापूर्वी हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही 23 दिवसांच्या अंतराने संपते. त्यामुळे दोन्ही विधानसभांची नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्हीही राज्यांच्या विधानसभा निवडणूक या 2009 पासून एकत्र होत आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली, तर महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी पूर्ण होईल. तर हरियाणाची विधानसभा निवडणूक प्रक्रिया 20 दिवस आधीच पूर्ण होणार आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरेल.