लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. प्रत्येक पक्ष जोमाने तयारीला लागला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेकडून या सर्वच पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. अनेक मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. अशात शरद पवार गटाने यात आघाडी घेतली असून लवकरच शरद पवार महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शरद पवार गट येत्या 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून फुंकणार आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरी किल्ल्यावरून शिव स्वराज्य यात्रा सुरू होणार आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीमध्ये दिली. या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सर्व मतदार संघात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करू. ज्या ठिकाणी शरद पवार गट मजबूत आहे, त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्याच्या बैठकीमध्ये जागेची मागणी करू तसेच पक्षाचे ध्येय धोरण काय आहे. तसेच कशा पद्धतीने समोर जायचं याबाबत काम करू, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. शिवस्वराज यात्रा संपूर्ण राज्यात फिरणार आहे, असं देखील अनिल देशमुख यांनी सांगितले. दरम्यान अमरावतीमध्ये अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली.
उद्धव ठाकरे हे देखील लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना ‘जागावाटपाची चिंता करू नका आणि केवळ संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा’ असं सांगितलं आहे. एकूणच शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.