शेतकरी कामगार पक्षाला अर्थात शेकाप ला या २ ऑगस्ट रोजी ७७ वर्ष पूर्ण झाली. स्थापनेला किती वर्षे झाली यावरूनच त्या कालखंडाचा अंदाज बऱ्यापैकी आपल्याला येतो. त्याकाळी आजच्या सारखं राजकीय पक्षांचं पीक आलं नव्हतं… काँग्रेस मधील असंतुष्ट नेत्यांनी एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. सुरवातीला महाराष्ट्रात शेकापचं राजकीय वर्चस्व अधिक होतं परंतु, गेल्या तीन चार दशकांपासून पक्षाला गळती लागली. सध्याच्या घडीला तर, शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगड मध्ये सुद्धा पक्षाला फार संघर्ष करावा लागतोय… पक्षातील जुने नेते देखील पक्षाला रामराम करत अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुण पिढीला शेकापचं आकर्षण दिसत नाही… एकेकाळी राज्यात एवढ्या नावारूपाला आलेला पक्ष आता मात्र अस्तित्वासाठी झुंजतोय… पक्षातील जुन्या नेत्यांनी पक्षाची साथ का सोडली असेल…? शेकापचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास काय सांगतो? याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
२ ऑगस्ट १९४७ रोजी आळंदी मध्ये काँग्रेसला कंटाळलेल्या नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. शेतकरी आणि कामगार वर्गाचे प्रश्न मांडण्याचे काम पक्ष करतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते. यामुळे पक्षाचा जनाधार आणखी वाढत गेला. ना. ना. पाटील, माधवराव बागल, तुळशीदास जाधव, एन डी पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता पाटील, दि. बा पाटील, प्रभाकर पाटील यांसारखे मात्तब्बर नेते पक्षात होते. एकेकाळी राज्याच विरोधी पक्षनेते पदही पक्षाकडे होतं. राज्याच्या मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी शेकापच्या काही नेत्यांना मिळाली. यामध्ये एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, मोहन पाटील, मिनाक्षी पाटील यांचा समावेश होता. पण गेल्या पंचवीस ते तीस वर्षात पक्षाला उतरती कळा लागली आहे. आणि यामुळे पक्षाचा जनाधार घटला आहे. पक्षाची अशी अवस्था झाल्यामुळे पक्षाची विश्वासार्हता देखील मोठ्या अडचणीत आली आहे. त्यामुळे पक्षाला एक एक आमदार निवडून आणण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो आहे. आणि याचा प्रत्यय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आला. शेकापचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातून पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. तर सांगोला मतदारसंघातून गणपतराव देखमुख यांच्या पश्चात शिवसेनेच्या शहाजीबापू पाटलांनी शेकापच्या अनिकेत देशमुख यांचा ७८६ मतांनी पराभव केला. मराठवाड्यातील लोहा मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी असलेले शामसुंदर शिंदे हे पक्षाचे एकमेव आमदार निवडून आले. निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी भाजपला समर्थन दिले आणि ते फक्त नावापुरतेच शेकापचे आमदार राहिले. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत देखील शेकापच्या जयंत पाटलांचं पराभव झाला. यामुळं पक्षाचं राज्यतील अस्तित्व आणखीनच धोक्यात आलं. विधान परिषदेतील जयंत पाटलांचा पराभव हा पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागला. याच मुख्य कारण म्हणजे रायगड जिल्ह्यात जयंत पाटील आणि शेकापला मानणारा वर्ग जास्त आहे. जयंत पाटील हे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसतानाही अनेकवेळा विधानपरिषदेवर निवडून आलेत. परंतु निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याने जयंत पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्यातील शेकापच वर्चस्व टिकून राहावं यासाठी जयंत पाटलांचा विधानपरिषदेत विजय होणं महत्वाचं होतं.