लोकसभेला भाजपने ४०० पारचा नारा दिला होता परंतु महाराष्ट्रातूनच भाजपला कमी जागा मिळाल्या. मात्र महाविकास आघाडीला लोकसभेला चांगलं यश मिळालं. लोकसभेच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीकडून केंद्र सरकारच्या विरोधात संविधान बदलणार असल्याचा फेक नेरेटिव्ह पसरवला गेल्यामुळे काही जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं, असा आरोप भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून महविकास आघाडीवर करण्यात आला. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी रॅप साँगच्या माध्यमातून ट्विट शेअर करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. लोकसभेच्या प्रचारावेळी महाविकास आघाडीने भाजप व महायुती सरकार जर बहुमताने सत्तेत आलं तर हे देशाचं संविधान बदलतील, असा आरोप केला गेला होता. आणि यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन झाल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले तर महायुतीचे केवळ १७ खासदार निवडून आले त्यामुळे महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीने फेक नेरेटिव्ह तयार केला असल्याचा आरोप महायुतीने केला होता.
नितेश राणे यांनी ट्विट करत शेअर केलेल्या रॅप साँग मध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
खोटं बोलून मतं मिळाली, मस्ती आली काय? महाराष्ट्राची जनता आता जागी झाली हाय… 500 मधून 100 जागा आल्या म्हणून पास होत नाय. 10-20 जागा वाढल्या म्हणून सत्ता येत नाय… अशा शब्दात रॅपच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे. या व्हीडिओमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार रोहित पवार यांचे फोटो देखील वापरण्यात आले आहेत.