राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला यश मिळाले. लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केले व ते महायुतीत सहभागी झाले. त्यानांतर लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा पवार कुटुंबातच संघर्ष झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा १,५८,३३३ मतांनी पराभव केला.
परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान अजित पवार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहिला मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार निवडणूक लढवणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित असताना आता यावर खुद्द युगेंद्र पवार यांनी या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याबाबत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दिली आहे. यासह युगेंद्र पवार म्हणाले, मी या मतदारसंघात अनेक दिवसांपासून सामाजिक कार्य करत आहे, इथल्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये लक्ष घालत आहे. साहेबांसाठी लोकसभेला मी इथे प्रचार केला, एवढंच आहे.