देशासह राज्यात अत्याचाराच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलापूरमध्ये नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. राज्यात घडत चाललेल्या या सर्व अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीने आज पुण्यात निषेध आंदोलन केलं. तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फीत बांधून शरद पवार यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत एक तास हे मुक आंदोलन पार पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत राज्यसरकारवर हल्लाबोल चढवला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यातच अनेक घटना घडल्या, इथे रक्त बदलण्यात आलं, ड्रग्ज प्रकरणे वारंवार समोर येतात, कोयता गँग अशा अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे, बदलापूरातील आंदोलनानंतर सरकारमधील नेत्यांनी म्हटलं आंदोलन करणारे बाहेरचे होते, पण ते कोणत्या का ठिकाणावरून येवो, ते भारतीय होते आणि ते भारतीय लेकीसाठी तिथे लढत होते. याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे. पण नंतर समोर आलं ती जनता ते आंदोलक बदलापूरमधील होते, ते आपल्या लेकीसाठी लढत होते, यातून सरकार कोणता विचार करतं ते लक्षात येतं, ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असं म्हणत सुळेंनी राज्य सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात एक बलात्कार झाला, हे कृत्य करणाऱ्या नराधमाला दोन महिन्यात आम्ही फाशी दिली असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे, जर हे सत्य असेल तर आपण सर्वजण मुख्यमंत्र्याचा सत्कार करायला जाऊ असंही सुळेंनी यावेळी म्हटलं. बदलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत संवेदनशील आहे, ही फक्त त्यांची लेक नाही, ही आपली देखील लेक आहे. सरकारला जमत नसेल तर आपल्या लेकींची जबाबदारी आपण सगळे घेऊयात. मविआच्या सर्व पक्षांनी मिळून ही जबाबदारी घेऊ आजनंतर कोणत्या लेकीवर अशी वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करू असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.