गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधून अनेक नकारात्मक बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्याने आपल्याला उलट्या होतात, असं वक्तव्य केले होते त्यामुळे महायुतीच्या पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आले. पण महायुतीच्या वरिष्ठांनी हे प्रकरण निवळलं होतं. तरीदेखील महायुतीमधील पक्षांना सातत्याने राजकीय धक्के बसताना दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीआधी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.त्यातच आता फलटणमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा थेट इशाराच दिला आहे.भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याविषयी असणाऱ्या तक्रारीची दखल न घेतल्यास यापुढील काळात तुतारी हातात घेऊ, असा एक इशाराच राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी दिला आहे.
”शेवटी काय करायचे ते आपल्या हातात राहिलेले नाही. सरकारला अनेक काम आहेत. भाजपला त्यांचे कार्यकर्ते, प्रशासनाला सांभाळण्याचं काम आहे. आपले भांडण हे भारतीय जनता पक्षासोबत नाही. आपण हिंदू मुस्लिम करत नाही. आपली तक्रार फक्त रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. दहशतीला सपोर्ट करू नका. आपली केवळ एवढीच तक्रार आहे. तेवढी सांगून बघू . जर फरक नाहीच पडला तर आपल्याला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर म्हणालेत.