विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभेला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेला मिळालेलं यश विधानसभेला कायम ठेवण्यासाठी काँग्रेस कडून प्रयत्न सुरु आहेत. विधानसभेसाठी राज्यात काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. पुण्यात सुद्धा काँग्रेसने रणनीती आखायला सुरवात केली आहे. पुण्यातून तीन मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येतील अशी चर्चा आहे. त्यामध्ये कसबा, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन मतदारसंघाचा समावेश असू शकतो. या तीन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार..? नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार अशी चर्चा आहे. त्यामुळं नवीन चेहऱ्यांना खरंच संधी मिळणार का? पुण्यात आखलेल्या या रणनीतीचा फायदा काँग्रेसला कितपण होईल..? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
पुण्यातील कसबा, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार निवडून आले होते. तीनही विधानसभा मतदारसंघाच्या २०१९ च्या निवडणुकीच्या निकालावर आपण एक नजर टाकूया… कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मुक्ता टिळक आणि काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांच्यात लढत झाली होती या निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांचा २८,१९६ मतांनी विजय झाला. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे आणि काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांच्यात लढत झाली होती यामध्ये भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी ५,१२४ मतांनी विजय मिळवला. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुनील कांबळे आणि काँग्रेसच्या रमेश बागवे यांच्यात लढत झाली होती यामध्ये भाजपच्या सुनील कांबळे यांनी ५,०१२ मतांनी विजय मिळवला.