विधानसभा निवडणुकीच्या दुर्ष्टीकोनातून शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवार हे सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत.तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाचा ते आढावा देखील घेत आहेत. दरम्यान, समरजित घाटगे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. समरजित घाटगे यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्याचप्रमाणं समरजित घाटगेंना शरद पवार हे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उतरवणार असल्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर, आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील नेत्यांनी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. ए.वाय. पाटील, के.पी. पाटील आणि अशोकराव जांभळे या तिन्ही नेत्यांनी भेट घेतली. के.पी. पाटील हे माजी आमदार असून अजित पवार गटात आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर के.पी. पाटील आणि ए वाय पाटील या दोघांनी अजित पवारांसोबाबत महायुतीमध्ये गेले. तसेच के. पी. पाटील आणि ए. वाय.पाटील हे दोघेही नातेवाईक आहेत.
परंतु, ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील हे दोघेही राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शरद पवार या नेत्यांची कशी समजूत काढतात आणि कुणाला तिकीट देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच हातकणंगले मतदारसंघ शरद पवार गटाने लढावा असा जांभळे यांचा आग्रह आहे. त्यामुळं शरद पवारांकडून अजितदादा गटालाच मोठं खिंडार पाडणार असं चित्र आहे. याबाबत आता शरद पवार काय निर्णय घेतात आणि महाविकास आघाडी शरद पवार गटाला ही जागा सोडणार का? याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलेलं आहे.