गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव तालुक्याचं राजकारण हे विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याभोवती फिरत आलंय. शरद पवारांचे मानसपूत्र म्हणून वळसे पाटलांची संपूर्ण राज्याला ओळख होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली फूट पडली आणि वळसे पाटील यांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांना साथ दिली. दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडलीय यावरच अनेकांचा विश्वास बसत नव्हता. दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून राजकारणात होते. तेव्हापासून म्हणजे दिलीप वळसे पाटील राजकारणात येण्यापूर्वीपासून शरद पवारांचा शब्द हा त्यांच्यासाठी अंतिम असायचा. त्यामुळं अशा निष्ठावंतानं आपली साथ सोडणं हा खरं तर शरद पवारांसाठी देखील मोठा धक्का होता. वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेल्यानं त्याचा परिणाम आता त्यांच्या बालेकिल्ल्यात आंबेगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यातील राजकारणात मोठा बदल झाल्याचं जाणकारांचं निरीक्षण आहे. जसं दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय होते अगदी तसंच आंबेगाव तालुक्यात देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटलांच्या जवळ होते. राष्ट्रवादीतील बंडानंतर देवदत्त निकमांनी वळसे पाटलांच्या सोबत जाण्याऐवजी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं. आणि आता शरद पवारांनी आंबेगाव तालुक्यात वळसे पाटलांविरोधात देवदत्त निकमांना ताकद दिलीय. आंबेगावमधून निकम यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेतही शरद पवारांनी दिले आहेत. त्यामुळं सलग सात वेळा आमदार राहिलेल्या दिलीप वळसे पाटलांना यावेळी आपला गड राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दिलीप वळसे पाटील हे जसे शरद पवारांचे शिष्य तसेच देवदत्त निकम हे वळसे पाटलांचे शिष्य त्यामुळं आंबेगाव विधानसभा मतदार संघातली लढाई ही केवळ वळसे पाटील आणि निकम यांच्यातली नसून ती शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील या गुरु-शिष्यातली देखील आहे. त्यामुळं दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम असा सामना झाल्यास निकम वळसे पाटलांना आव्हान देऊ शकतील का? आंबेगावात देवदत्त निकमांची ताकद आहे का? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
काही दिवसांपूर्वीच आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली. या सभेत वळसे पाटील समर्थक आणि देवदत्त निकम समर्थक एकमेकांना भिडले. आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही, बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला, हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले असा आरोप देवदत्त निकम यांनी केला. आणि याच मुद्द्यावरुन दोन्ही गटात मोठा वाद झाला. दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, खुर्च्या नाचवत एकमेकांना हिणवलं, हा सगळा प्रकार मंचावर असलेले दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर घडला. वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं मात्र कोणीही दाद दिली नाही. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि देवदत्त निकमांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. यावरूनच देवदत्त निकमांनी आम्हाला सभेतून हाकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. यावर विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजण्याचे प्रयत्न निकामांनी केल्याचा पलटवार अजित पवार गटाकडून करण्यात आला. देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत हा गदारोळ करून काय साध्य केलं? उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले असा पलटवार अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला. पण या घटनेमुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग चांगलाच दुखावल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही तर ४० ते ४२ गावांतील शेतकरी एकवटले असून जे आमच्या जीवावर मोठे झाले त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांविरोधात होमग्राउंडवरच मोठं आव्हान उभं राहिलं आहे.