पुणे। जैन समाजाची सर्वात मोठी संघटना असलेल्या जीतो अॅपेक्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी पुण्यातील विजय भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. २०२४ ते २०२६ या दोन वर्षांसाठी ते हा पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात विशेष जल्लोष करून आनंद साजरा केला जात आहे. जीतो अॅपेक्स श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून ते सध्या काम पाहत होते. यापूर्वी त्यांनी जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष, जीतो पुणेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
जैन समाज हा विशेष करून उद्योग व व्यापार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळतो. या क्षेत्रातील वर्तमान व येणाऱ्या नवीन पिढीला उद्योग व व्यापार क्षेत्रात अधिक वाव मिळावा, जगभरातल्या संधी समजाव्यात आणि त्यासाठी आपण सर्वार्थाने तयार व्हावं म्हणून कार्य करण्यासाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) या संस्थेची स्थापना प.पू. नय पद्मसागर म.सा. यांच्या आशिर्वादाने मुंबईत झाली. या जीतो संघटनेच्या भारत देशातील ७० शहरात आणि जगभरात २९ ठिकाणी चॅप्टर आहेत. ४८ हजार सभासद असलेल्या जीतो संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आता विजय भंडारी सांभाळणार आहेत. विजय भंडारी हे स्वतः प्रसिद्ध उद्योजक आहेत. पेपर इंडस्ट्रीमध्ये त्यांनी अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. याबरोबरच सामाजिक क्षेत्रात जीतो संघटनेबरोबरच लायन्स क्लब, आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट, जैन युगल धर्म संघ, सावली वृद्धाश्रम आदी संस्थांच्या माध्यमातून ते काम करीत आहेत. लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ चे गव्हर्नर म्हणून २०२३ ते २०२४ या कालावधीत त्यांनी काम केले आहे. लायन्स क्लब्ज च्या इतिहासात पहिल्यांदाच थेट गव्हर्नरपदी नियुक्ती झालेले विजय भंडारी एकमेव लायन्स आहेत. विजय भंडारी यांचे कल्पक नेतृत्व व त्यांच्या संघटन कौशल्यामुळं जीतो कनेक्ट हे आंतरराष्ट्रीय संमेलन पुणे शहरात दोनवेळा झाले. दोन्ही वेळेस साडेचार लाखांहून अधिक संख्येने उद्योजक व व्यापारी या संमेलनात सहभागी झाले होते. २०२२ मध्ये झालेल्या जीतो कनेक्टचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाले. त्यावेळी केलेल्या २७ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी जीतो संघटनेकडून होत असलेल्या कार्याचा गौरव केला होता. उद्योग व व्यापार क्षेत्रात जगभरात कार्यरत असलेल्या जैन समाजातील उद्योजक व व्यापाऱ्यांचे नेटवर्क उभा करणे आणि त्यांना या क्षेत्रातील संधींसाठी अपडेट करण्याचे महत्वपूर्ण काम जीतो संघटना करत आहे. याबरोबरच महिला व युवा पिढीच्या विकासासाठी देखील या संघटनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरु आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धा परीक्षा, सीए, आंतरराष्ट्रीय शिक्षण, क्रीडा या क्षेत्रात जैन समाजातील युवा पिढीला यश मिळावं यासाठीही जीतोतर्फे पुढाकार घेतला जात आहे. तसेच, जैन समाजाच्या सर्व पंथांचे गुरुसंत, साधु व साध्वी म.सा. यांच्या उत्तम आरोग्यासाठी संघटनेच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत.
मोठी संधी… जबाबदारीचं भान ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणार!
जीतो संघटनेचा विस्तार जगभर आहे. देशात ७० आणि परदेशात २९ चॅप्टर आहेत. २१ व्या शतकात आपला भारत देश जगाचं नेतृत्व करण्याचं नियोजन करीत असताना प्रत्येकाने त्या मिशनचा भाग बनण्याची आवश्यकता असून जीतो संघटना देखील त्यासाठी बहूमूल्य योगदान देईल. मी पुढील दोन वर्षे जीतो संघटनेचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं काम पाहणार आहे. या कालावधीत जीतो संघटनेच्या वैभवात आणखी भर घालण्यासाठी आम्ही सर्वजण सर्वांच्या साथीने प्रयत्न करणार आहोत. मला मिळालेली ही जबाबदारी मोठी आहे. सर्वांना सोबत घेऊन जबाबदारीचं भान ठेऊन आम्ही सर्वजण येणाऱ्या काळात काम करणार आहोत. देशाच्या विकासात जीतो संघटना महत्वाची भूमिका बजावेल आणि त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
विजय भंडारी (नवनियुक्त अध्यक्ष, जीतो अॅपेक्स इंटरनॅशनल)