राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागताच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीच्या सरकारमधला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरु करून प्रचाराला दणक्यात सुरवात केली. अजित दादांच्या पाठोपाठ लागेचचं महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रचाराला सुरवात केली. या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा काका-पुतण्याचा प्रयत्न पाहून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी देखील यात्रेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाच्या मैदानात उतरण्याचं नियोजन केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पितापुत्र देखील संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा काढणार असल्याचं बोललं जात आहे. आता या यात्रेचा फायदा शिवसेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत होणार..? तसचं जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांना प्रसिद्धी मिळत आहे अशीच प्रसिद्धी शिवसेनेच्या मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रेला मिळणार का..? याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
राज्यात लोकसभेला फटका बसल्यामुळे महायुती खडबडून जागी झाली आहे. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला टाळण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करायला सुरवात केली आहे. अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं राज्यभर जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार हे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचत आहेत. अजित दादांना लोकसभेला मोठा फटका बसला आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील पराभवाला सामोरे जायला लागू नये यासाठी अजित पवारांनी राज्यात ८ ऑगस्ट पासून नाशिक मधल्या दिंडोरीमधून आपल्या जनसन्मान यात्रेला सुरवात केली आहे. या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. अजित पवारांचा महायुतीतला सहभाग भाजपसह शिवसेनेच्या अनेक नेत्यांना पटला नाही. अजित पवारांमुळेच महायुतीला फटका बसल्याचं भाजप शिवसेनेच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. परंतु, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याशिवाय त्यांच्याकडं पर्याय नाही. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत. त्यांनी यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. पण काही दिवसांनंतर त्यांच्याकडून मुख्यमंत्री शब्द वगळून माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळत आहे. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात जिथे जिथे ते जातात तिथल्या बॅनर्स वर माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख करून लाडकी बहीण योजनेचं मोठ्या प्रमाणात ब्रॅंडिंग करताना त्याचं संपूर्ण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न अजित पवार करीत असल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांनी चालू केलेल्या या जनसन्मान यात्रेचा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत फायदा होणार हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल.