उद्योगजगताचे दिग्गज आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती म्हणून त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. अखेर काल रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ८६ वर्षांच्या रतन टाटा यांनी आपल्या कार्यकाळात भारतीय उद्योगजगतात एक अनोखी ओळख निर्माण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजकीय तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी रतन टाटांना आपल्या सोशल मीडिया, एक्सवरून आदरांजली वाहिली व त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
व्यावसायिक यशाबरोबरच रतन टाटा यांची सामाजिक बांधिलकी आणि दानशूरता यांचीही ओळख होती. शिक्षण, आरोग्य, आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय राहील. त्यांच्या नेतृत्वामुळे टाटा समूहाने विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग घेतला. त्यांच्या याच योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटांची तब्येत खालावली होती. नंतर त्यांच्यामध्ये सुधारणा झाल्याचं सांगण्यात आलं परंतु काल रतन टाटांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत नरिमन पॉइंट येथील शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, टाटा समूहाने त्यांच्या निधनानंतर शोकसभेचे आयोजन केले आहे.रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार आचार व त्यांची शिकवण ही पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श असेल. त्यांच्या जाण्याने देशाने एक दूरदृष्टी असलेला, कर्तबगार आणि उदार नेतृत्व गमावले आहे. रतन टाटांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगामधून हळहळ व्यक्त होत आहे.