मुंबई | मुंबईच्या प्रभादेवी परिसरात नुकताच शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये राडा झाला होता. याप्रकरणी दादर पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली होती. पोलिसांनी या सगळ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याशिवाय, आणखी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना पक्ष प्रचंड आक्रमक झाला होता. अखेर या शिवसैनिकांना रविवारी जामीन मिळाला. त्यानंतर हे पाच शिवसैनिक थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंनी त्या शिवसैनिकांवर कौतुकाची थाप दिली. कोणी आमच्या अंगावर आले तर, आम्ही शिंगावर घेऊ, अशी प्रतिक्रिया यावेळी महेश सावंत यांनी दिली.
गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत वादावादी झाली होती. यावेळी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी माईकवरुन म्याव-म्यावचा आवाज काढत शिवसैनिकांना डिवचले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद तात्पुरता शमला होता. मात्र, दादर पोलीस स्टेशनच्या परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने आले होते. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला होता.
दादर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते, तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. याविरोधात शिवसेना अॅक्शन मोडमध्ये आली होती. रविवारी सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात शिवसेनेनेच बडे नेते एकापाठोपाठ एक दाखल होताना दिसत आहेत. शिवसैनिकांवरील अटकेच्या कारवाईविरोधात जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सर्वप्रथम दादर पोलीस ठाण्यात दाखल झाले. अरविंद सावंत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल परब आणि अंबादास दानवेही हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध केला.
या पाच शिवसैनिकांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे आणि शिवसैनिकांमध्ये शनिवारी मध्यरात्री पुन्हा वाद झाला होता. शिवसैनिक आपल्याला मारहाण करण्यासाठी आले होते, असे संतोष तेलवणे यांनी म्हटले. त्यावेळी शिवसैनिकांनी माझी दोन तोळ्याची चेन चोरली, अशी तक्रार तेलवणे यांनी दादर पोलिसांकडे दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर हे सर्वजण थेट मातोश्रीवर दाखल झाले. याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. परंतु, त्यांना संयम बाळगण्याचाही सल्ला दिला.
शिंदे गटाला भिडणारे हे पाच कायकर्ते मातोश्रीवर पोहोचल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात आला. आता हा वाद आणखी किती चिघळणार हे पाहावे लागेल. पोलिसांनी आता या प्रकरणात सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. खरंतर यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवला आहे. आमच्या अनिल परब यांनी कायद्याचा कीस काढून पोलिसांना ही बाब पटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गु्न्हा दाखल केल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.