मुंबई | महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबातील आणखी एका सदस्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. भविष्यात निवडणूक लढवू शकतो, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी केलं. गरज पडली तर मी सुद्धा निवडणूक लढवेन, असं अमित ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपण निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आणि ती खरी करुन दाखवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी भूमिकाही जाहीर केली होती. पण त्यांनी निवडणूक मात्र लढवली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं आणि ते विधानपरिषदेवर निवडून गेले. आता अमित ठाकरे यांनीही निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत
अमित ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. विविध भागांमध्ये जाऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. जोरदार स्वागत त्यांचं ठिकठिकाणी केलं जात आहे. अशाच दौऱ्यादरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. सध्याची राजकीय परिस्थिती, मनसेची पुढील वाटचाल याबाबत त्यांनी मुलाखतीत भाष्य केलं.