पुणे | रेल्वे विभागात बाबूगिरीचा हुकूम चालतो हे पुन्हा एकदा समोर आले असून याचा फटका आता थेट खासदारांना बसल्याचं दिसून आलं आहे. पुण्यात झालेल्या रेल्वे विभागाच्या बैठकीत वाद झाल्यानंतर रेल्वे विभागीय समितीचे अध्यक्ष खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह सदस्य असणाऱ्या खासदारांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.
कोविड काळात सुरु असलेले रेल्वे गाड्या पुन्हा सुरु कराव्यात, विद्यार्थी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार थांबे द्यावेत अशा विविध मागण्या सातत्याने करून देखील रेल्वेचे अधिकारी ते ऐकत नसल्याने या बैठकीत सर्वच खासदार आक्रमक झाले. रेल्वे प्रशासनाने आपलीच मनमानी सुरु ठेवल्याने आपण विभागीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी जाहीर केले. याच पद्धतीने या समितीचे सदस्य असलेल्या खासदारांनी देखील आपले राजीनामे दिल्याने आता हा वाद मोठा होण्याची शक्यता आहे.
आज DRM पुणे कार्यालय येथे आयोजित रेल्वे समितीच्या बैठकीत रेल्वे विभागीय मंडळाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात काही मागण्या केल्या. कोविडपूर्वी ज्या स्थानकावरती रेल्वे थांबा होता असे सर्व पूर्वरत करावे थांबा मिळावा, लोकांची गैरसोय थांबावी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांचे प्रश्न सुटावेत, भुयारी मार्ग, आणि दोन गावांना जोडणारे रस्ते जे रेल्वे अधिकार क्षेत्रात येतात ते दुरुस्त करावेत, कुर्डूवाडी रेल्वे डब्याचा कारखाना चालू रहावा अशा प्रकारच्या मागण्या खासदारांनी केल्या. स्टेशन सुविधा आणि सुधारणा, किसान रेल यासाठी वारंवार रेल्वे अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा हे प्रश्न सुटत नसल्याने या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि रेल्वे बाबू यांच्यात जोरदार घमासान झाले.
वारंवार मागणी करून रेल्वे बोर्ड सदस्य असणाऱ्या खासदारांच्या मागणीला किंमत देत नसल्याने या रेल्वे मंडळाचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत असल्याचं खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं. यावेळी इतर सर्व खासदारांनीही रेल्वे मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली. यापुढे रेल्वे मंडळाच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या बैठकीला विभागीय अध्यक्ष असणारे खासदार रणजित निंबाळकर हे भाजपचे खासदार आहेत. या बैठकीस खा. ओमराजे निंबाळकर , खा. जयसिद्धेश्वर स्वामी, खा. उमेश जाधव, खा. श्रीरंग बारणे, खा. श्रीनिवास पाटील, खा. धैर्यशील माने, खा. हेमंत पाटील, खा. धनंजय महाडिक आणि रेल्वे GM लाहोटी, DRM रेणू शर्मा तथा निलेश ढोरे उपस्थित होते.