मुंबई | जनमानसात चुकीचा संदेश जात आहे. या सगळ्यांमुळे माझ्या मनाला अत्यंत वेदना होतात. जिथे जाऊ तिथे खोक्यांवरून ऐकावे लागते. इतक्यावेळा खोक्यांचा आरोप झाला आहे की, ‘एखाद्याच्या लग्नात गेलो तरी लोकं ‘खोकेवाला आला’ बोलतात’, असे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सांगितले.
शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. त्यावेळी शिंदे यांनी शिवसेनेतील अनेक खासदार, आमदार फोडले होते. काही अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत आले. त्यापैकी बच्चू कडू एक आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या नेत्यांवर खोके घेतल्याचा आरोप केला जात होता. त्यावरूनच आता बच्चू कडू यांनी विधान केले. ते म्हणाले, रवी राणा (Ravi Rana) यांचे आरोप हे शिंदे गटातील सर्व आमदारांबाबत शंका उपस्थित करणारे आहेत. त्यामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात आहे. या सगळ्यामुळे माझ्या मनाला अत्यंत वेदना होतात. जिथे जाऊ तिथे खोक्यांवरून ऐकावे लागते. खोक्यांचा आरोप इतका झाला आहे की, एखाद्याच्या लग्नात गेलो तरी लोकं ‘खोकेवाला आला’ बोलतात.
रवी राणांचा बोलविता धनी कोण?
20 वर्षे आम्ही लोकांमधून निवडून येतो तरीदेखील इतक्या खालच्या पातळीवर आम्हाला टीका सहन करावी लागते. रवी राणा एकट्याच्या जीवावर ही टीका करणार नाहीत. त्यांची तेवढी कुवत नाही. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे तपासणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.