अमरावती | रवी राणा यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आज अमरावतीत जोरदार मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शेरोशायरीने करत रवी राणा यांना नाव न घेता इशारा दिला. प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही. प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद आहे. तो बाजी आहे. तानाजी आहे. वार करण्याची क्षमत आमच्यात आहे. मैदानात असेल मैदानात, तलवारीत आले तर तलवारीत आणि सेवेत आले तर सवेत आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही आणि गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड मारू नका. सत्ता गेली चुलीत. आम्हाला काही पर्वा नाही, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.
जली को आग खते है और बुझी को राख कहते है और जिस बारूद जो निकलता है उसे प्रहार कहते है, अशी आपल्या भाषणाची सुरुवात बच्चू कडू यांनी केली. हा काही सत्तेचा पाठिंबा किंवा शक्तीप्रदर्शनाचा विषय नाही. आमचा पक्ष काही मोठा नाही. त्यामुळे आमच्या मेळाव्याला नियोजन नाही. आम्ही सैनिकांसारखं जगतो. फार विचार करत नाही. गर्दीमध्ये दर्दी आहेत. उगाच काय बच्चू कडू चार वेळा निवडून येतोय? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
आम्ही दिवस पाहिला नाही. रात्र पहिली नाही. आम्ही लोकांसाठी धावत होतो. काम करत होतो. गेल्या 25 वर्षात राज्यातील एकही कोपरा सोडला नाही. इतका महाराष्ट्र फिरलो. तेव्हा कुठे दिव्यांगांना सत्तेत स्थान मिळालं, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राणांबरोबरचा विषय संपल्याचंही स्पष्ट केलं. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आम्हाला बदनाम केलं जात आहे. आम्ही गुवाहाटीला का गेलो? माझ्याकडे मंत्रिपद होतं. मंत्रिपद सोडून कोण जातं का? पण जिथे तत्त्व येतं तिथे काही निर्णय घ्यावे लागतात, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही काँग्रेसला जळतं घर म्हटलं होतं. पण जेव्हा वंचितांना न्याय द्यायची वेळ आली तेव्हा ते काँग्रेससोबत सत्तेत गेले. गोरगरीबांसाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असं त्यांनी सांगितलं.