पुणे | महाराष्ट्र केसरीचे डिसेंबर महिन्यात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार रामदास तडस आणि माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. त्यामध्ये या स्पर्धेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी २० ते २५ डिसेंबरदरम्यान पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह उपस्थित राहतील. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आव्हान दिलं होतं. मात्र, राज ठाकरेंनी प्रकृतीच्या कारणास्तव तेव्हा दौरा रद्द केला होता. पण, बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणती भूमिका घेते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, राज ठाकरे ५ जून २०२२ ला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. तशी त्यांच्या कार्यकर्त्यांची तयारी देखील सुरु झाली होती. मात्र राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांनी माफी मागावी. अन्यथा उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिलं होतं. आता बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार म्हणून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.