मुंबई | राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेतच आता मुख्यमंत्र्यांना भेटता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयात वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालयातील एकूण चार दरवाजे आहेत. त्यापैकी तीन दरवाजे बंद करून केवळ एकच दरवाजा सुरु राहणार आहे. त्यामुळे जर नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायची असेल तर नव्या वेळेतच भेटता येणार आहे. तसेच जर अधिकाऱ्यांची ज्या विभागात बैठक आयोजित केली असेल तर त्याच विभागात त्यांना जाता येणार आहे. त्यासाठी त्यांनाही या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.
दरम्यान, मंत्रालयातील वाढती गर्दी लक्षात घेता मंत्रालयाच्या गेटवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच बंदोबस्ताच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.