मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या नियमित जामीन अर्जावर विशेष न्यायालय २४ नोव्हेंबर रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे. मलिक आणि अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपशीलावर युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मलिक यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला. तसेच तो २४ नोव्हेंबर रोजी देणार असल्याचे स्पष्ट केले.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिक अटकेत आहेत. मलिक हे सध्या अटकेत असले तरी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. न्यायालयाने मलिक यांची खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची मागणी मान्य केली होती. मलिक हे बराचकाळ खासगी रुग्णालयात दाखल असल्याने ईडीने त्याला विरोध केला होता. तसेच मलिक यांची प्रकृती ठीक असून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली होती.
दरम्यान, मलिक यांनी जुलै महिन्यात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. आपल्या विरोधात या गुन्ह्याव्यतिरिक्त अन्य कोणताही गुन्हा दाखल नाही, असा दावा मलिक यांनी जामिनाची मागणी करताना केला आहे. तर हे प्रकरण दाऊदच्या मालमत्तांशी संबंधित असून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असा दावा करून ईडीने मलिक यांच्या जामिनाला विरोध केला होता.