मुंबई | राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौऱ्यावरुन सुरु असलेल्या चर्चांबाबत भाष्य केलं आहे. बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नाही. या दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारला कळवलं आहे. याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिलं.
६ डिसेंबरला बेळगावामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी आमचा दौरा हा निश्चित केलेला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन ते जो आदेश देतील त्यानुसार निर्णय घेऊ, असं शंभूराज देसाई म्हणाले.
तसेच देसाई यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे. मंत्री बिलकुल घाबरत नाही. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकतो. पण आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे. समन्वयातून यामधून तोडगा काढायचा आहे. हे प्रकरण चिघळू न देता, केंद्राने याच मध्यस्थी करावी आणि समन्वयातून दोन्ही राज्यांमधील हा प्रश्न सोडवावा ही आमची भूमिका आहे. आततायीपणा करुन, कायदा हातात घेऊन आम्हाला हे प्रकरण चिघळवायचं नाही. मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, तिथल्या नागरिकांची जी भावना आहे, त्या भावनेच्या पाठिशी आम्ही आहोत. असे देसाई यांनी दानवे यांना उत्तर दिले.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्राच्या जत, अक्कलकोट, सोलापूर अशा भागांवर दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगाव दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, सीमावाद चिघळू नये, यासाठी मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीही शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना बेळगावला न जाण्याच्या सूचना दिल्याची चर्चा होती परंतु त्यावर अखेर शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिल आहे.