पुणे | कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या २७ फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित केली आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
दरम्यान, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक ही निवडणूक लढवणार का अशी चर्चा आहे. तसेच शैलेश टिळकांनी घरातच उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शैलेश टिळक राजकारणात फारसे सक्रिय नाहीत त्यामुळे मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळक ही निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
तर कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीही लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.