पुणे | उद्योगपती पुनीत बालन यांच्या मिनरल वॉटर ब्रॅण्डची चर्चा पुण्यासह आता राज्यात होऊ लागली आहे. याच कारण म्हणजे त्यांनी केलेली दहिहंडी आणि गणेशोत्सवाचा काळातली बॅनरबाजी. परंतु हीच बॅनरबाजी त्यांच्या अंगलट आली आहे. पुणे महापालिकेकडून शहरभर अनधिकृत होर्डिग्ज लावल्याबद्दल तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बालन यांनी लावलेल्या अनधिकृत जाहिराती पुणेकरांना अडचणीच्या देखील ठरल्या आहेत. विशेषत: त्यांनी ऐतिहासिक शनिवारवाडा परिसराच्या दर्शनाला अडथळा निर्माण केल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडेही अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने गणेशोत्सव काळात जाहिरातींचे शुल्क माफ केले असले तरी दहीहंडी उत्सवासाठी परवानगी आवश्यक होती. 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान, बालनच्या कंपनीची जाहिरात करणारे अंदाजे 2,500 फलक पुणे शहरातील रस्त्यांवर लावण्यात आले होते. प्रत्येक पॅनेल किमान चार बाय आठ फूट मोजले. प्रति पॅनेल 40 रुपये दैनंदिन शुल्काच्या आधारे दंडाची गणना करून पीएमसीने 3.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बालनला दंड भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.निर्धारित वेळेत पैसे न भरल्यास त्याच्या मालमत्ता करातून रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा देखील त्यांना देण्यात आला आहे.
पुनीत बालन हे अनेक वर्षांपासून अनेक दहीहंडी आणि आणि गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत करतात. याच्या मोबदल्यात या मंडळांनी त्यांच्या भागात त्यांच्या ऑक्सिरिच पाण्याच्या बाटल्यांचे ब्रँडिंग करण्यास परवानगी दिली आहे. या कालावधीत पुणे शहरात केवळ पुनीत बालन यांच्या फ्लेक्सची चर्चा होती एवढच काय सोशल मिडियावर देखील याचे मिम्स पाहायला मिळाले.