राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी विभागली गेली. अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे,दिलीप वळसे पाटील अशा अनेक दिग्गजांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर शरद पवारांनी राज्यभर सभा घेतल्या. शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी देखील साथ सोडल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला होता. शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्या होम ग्राऊंडवर सभा देखील घेतली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे.
२१ फेब्रुवारीला आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे शरद पवारांची सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते देवदत्त निकम यांनी दिली.शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या सभेसाठी तयारी सुरू केली आहे. या सभेतून शरद पवार हे लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडतील अशी देखील चर्चा आहे. अमोल कोल्हे यांच्या बालेकिल्ल्यात ही सभा होत असल्याने अमोल कोल्हे यांनी देखील तशी तयारी केली आहे. तसेच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून देखील या मतदार संघावर दावा केला जात असून त्यांनी अनेकदा तसे जाहीर देखील केले आहे. त्यामुळं शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवार यांनी प्रत्येक मतदार संघाचे दौरे वाढवले असून आता आंबेगावचा दौरा हा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न शरद पवार करणार असल्याची देखील चर्चा आहे. विधानसभेसाठी देखील शरद पवार वळसे पाटील यांच्या विरोधातील चेहरा म्हणून देवदत्त निकम यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच अमोल कोल्हे यांच्यासाठी देखील आगामी लोकसभेसाठी फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे. २१ तारखेला होणाऱ्या सभेत दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल शरद पवार काय भाष्य करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.