पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सध्या महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकासआघआडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोर यांना उमेदवारी जाहीर करम्यात आलीये. या तीनही उमेदवारांनी मंगळवारी 16 एप्रिलरोजी एकत्रित येत एकाच व्यासपीठालवरून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे या तीघांनीही पुण्यासाठीचं व्हिजन माध्यमांसमोर मांडलं. आपण खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर पुणे शहरासाठी आणि नागरिकांसाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवणार यासाठीचं आश्वासन तीनही उमेदवारांनी यावेळी दिलं. यावेळी सर्वप्रथम महायुतीचे अधिकृत उमेदवार पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुरुवातीला त्यांनी गेल्या 5 वर्षात पुणे महापालिकेत आणि 10 वर्षात नरेंद्र मोदींनी देशात केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा निवडणूकीसाठी त्यांचं व्हिजन सांगितलं.
माझं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर असावं, असा आमचा प्रयत्न असणार आहे. आधी केंद्रात राज्यात आणि पालिकेत एकच सत्ताधारी होते. त्यावेळी त्यांनी पुढच्या 50 वर्षांचा विचार केला नाही, असं मला वाटतं. कागदावरची मेट्रो आम्ही सत्यात आणली. आधीच्या लोकांनी अनेक कामाची फक्त उद्घाटन केली, कामं केली नाहीत. आम्ही करून दाखवलं अस म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सोबतंच शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. PMPML बसेस वाढवाव्या लागतील. शहरात मेट्रोचा विस्तार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय, रिंग रोड पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. नदी प्रकल्प पूर्ण करणे. पुरंदरचं विमानतळ उभारणं. नवी मुंबई आणि पुण्याच विमानतळ रेल्वे मार्गाने जोडण्याचा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ पुणे शहर करणं गरजेचं आहे. अनेक नॅशनल रिसर्च सेंटर आणणार आहे. IIT चे सेंटर पुण्यात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिलं.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर त्याचं पुणे व्हिजन स्पष्ट करताना म्हटले की, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. देशातील पहिली मेट्रो काँग्रेसने पळवली. माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुण्याचा खरा विकास केला. ड्रग्स, पुण्याची गुन्हेगारी यावर मी सातत्याने बोलत आहे. सत्ताधारी फक्त घोषणा करतात, काम करत नाहीत असंही धंगेकर म्हणाले. पुण्यासाठी मनमोहन सिंग यांनी 350 कोटी रुपये दिले होते. आता आपल्या शहराला काय मिळत आहे, हे पाहणे गरजेचं आहे. विचारांची लढाई विचाराने लढायला हवी, असं त्यांनी म्हटलं. सोबतच देशात शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आहेत, याकडे लक्ष द्यायला हवं. देशात शेतकरी, व्यापारी विद्यार्थी सगळे अडचणीत आहेत. जर देशात 400 पार होणार असतील, तर इथून मी एकटा निवडणून आलो तर काय होईल असं म्हणत धंगेकरांनी मोहोळांना टोलाही लगावला.
दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनीही त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. शहरतील वाहतूक कोंडी ही महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे शहराच्या चारही बाजूला बस स्थानक होणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट करावी लागेल. पुण्यात पाणी प्रश्न गंभीर आहे. शहरात पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. यासाठी शहरासाठी नवं धरण उभारणं किंवा शहराच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांचं नियोजन करणं आवश्यक आहे. पाणी ,ट्रॅफिक, रस्ते यासाठी जाणकार लोकं बसवणं आवश्यक आहे. आपल्या नद्यांचं संवर्धन केलं पाहिजे. शहरातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आहे, याकडे लक्ष द्यावं लागेल. महिलांच्या समस्यासाठी शहरात वेगळं महिला पोलिस आयुक्तालय होणं गरजेचं आहे. शहराची आरोग्य व्यवस्था सक्षम होणं गरजेचं असल्याचं मोरेंनी स्पष्ट केलं. सोबतच पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतीक भावनाच काम पूर्ण करणार. शहरात वाचनालय सुरू करणार. असं आश्वासन वसंत मोरेंनी दिलं. माझा अजेंडा माझ्या डोक्यात आहे, कागदावर नाही असा टोलाही वसंत मोरे यांनी मोहोळ यांना लगावला.
या संपुर्ण वार्तालाभ कार्यक्रमात पुणे लोकसभा मतदारसंघातील तीनही उमेदवारांनी आपलं व्हिजन मांडलं. ते मांडत असताना उमेदवारांनी जनतेला आश्वासनं देत एकमेकांना टोलेही लगावले. आता या तीन उमेदवारांपैकी जनता कुणाच्या बाजूनं मत देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.