शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एक विषय आवर्जून मांडला आणि त्याविषयी खंत देखील व्यक्त केली. ते म्हणाले केदारनाथ मंदिरात सोन्याचा घोटाळा झालाय आणि केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं गायब झालं आहे. याला जबाबदार कोण? याची चौकशी का होत नाही? मीडिया याबद्दल प्रश्न का विचारत नाही? असे प्रश्न त्यांनी यानिमित्तानं उपस्थित केलेत. आणि त्यानंतर एकच चर्चा सुरु झालीय ती म्हणजे हे २२८ किलो सोन्याचं प्रकरण नेमकं काय आहे. याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
शंकराचार्यांनी उल्लेख केलेला सोन्याचा घोटाळा जून २०२३ मध्ये उघडकीस आला होता. तेव्हा केदारनाथ धामचे मुख्य पुजारी संतोष त्रिवेदी यांनी आरोप केला होता की मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर १२५ कोटी रुपयांचा सोन्याचा मुलामा चढवण्यात आला होता.हे सोनं २००५ मध्ये मंदिराच्या भिंतीवर बसवण्यात आलं होतं.काही दात्यांनी हे सोनं दान केलं होतं. मात्र त्या सोन्याचं आता पितळेत रूपांतर झाल्याचा दावा संतोष त्रिवेदी यांनी केला होता. त्यांनी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीवर अनियमिततेचा आरोप केला होता. मात्र, मंदिर समितीने हे आरोप फेटाळून लावत हे व्यवस्थापनाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं म्हटलं होतं.या प्रकरणाबाबत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणतात की, सरकारने याची कधीही चौकशी केली नाही. राजधानी दिल्लीतील बुरारी इथं केदारनाथ मंदिर बांधलं जात आहे. रुद्रप्रयागमधील केदारनाथ मंदिराप्रमाणेच हे मंदिर असेल. त्याचं भूमिपूजन काही दिवसांपूर्वीच झालं. या कार्यक्रमात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय मंत्री अजय टम्टा, महामंडलेश्वर कैलाशनंद गिरी जी महाराज आणि केदारनाथ धाम ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र रौतेला उपस्थित होते. दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या या मंदिराला उत्तराखंडमध्येही जोरदार विरोध केला जातोय. याविरोधात संत आणि पुरोहितांनी आंदोलन सुरू केलं आहे. दिल्लीत केदारनाथ धामच्या नावाने मंदिर बांधणं म्हणजे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या केदारनाथ धामच्या पावित्र्याचा अपमान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचवेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही याला कडाडून विरोध केला आहे. प्रतीकात्मक केदारनाथ मंदिर बांधता येणार नाही, असं ते म्हणतात. त्यांचं हे ही म्हणणं आहे की शिवपुराणात १२ ज्योतिर्लिंगांची नावं सांगितली आहेत आणि जिथं त्यांची नावं सांगितली आहेत, तिथं त्यांचे पत्तेही सांगितले आहेत. जसं की सौराष्ट्र सोमनाथम. प्रथम सौराष्ट्र म्हणजे पाटा आणि नंतर सोमनाथ. त्याचप्रमाणे केदारम हिमावत पान म्हणजेच केदार हे हिमालयाच्या मागच्या भागात आहे. केदार हिमालयात असेल तर दिल्लीत आणून ठेवणार कसा. शिवपुराणात स्पष्टपणे सांगितलंय की केदारनाथ धाम हिमालयातच आहे…मग तुम्ही त्याचं स्थान का बदलू इच्छिता? जनतेचा भ्रमनिरास का करायचा? देवाची हजारो नावं आहेत, कोणत्याही नावाने त्याची पूजा करा. पण केदारनाथ धाम दिल्लीत बांधलं जाईल, हा अनधिकृत प्रयत्न आहे आणि असं होऊ नये.आता यावर राज्य सरकारचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजयेंद्र अजय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणतायत की, दिल्लीतील मंदिराच्या उभारणीशी उत्तराखंड सरकारचा काहीही संबंध नाही. हे काम केदारनाथ ट्रस्ट नावाची संस्था करत आहे. राज्य सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नाही. धार्मिक कार्यक्रम असल्यानं मुख्यमंत्र्यांनी काही संतांच्या विनंतीवरून पायाभरणी समारंभाला हजेरी लावल्याचं ते म्हणाले. या संपूर्ण वादामुळे ट्रस्टने आता मंदिराचं नाव बदलण्याची तयारी दर्शवली आहे. श्री केदारनाथ धाम दिल्ली ट्रस्टचे प्रमुख सुरेंद्र रौतेला यांनी म्हटलं आहे की, दिल्लीत धाम नाही तर मंदिर बांधलं जात आहे. मंदिराचं नाव बदलण्याबाबत समितीमध्ये चर्चा झाली असून नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलं. पण शंकराचार्य यांचा आरोप आहे की राजकीय लोकं धार्मिक स्थळांमध्ये हस्तक्षेप करत आहेत आणि याचवरून त्यांनी केदारनाथ धाममधून २२८ किलो सोनं गायब झाल्याचं म्हटलं आहे.