मुंबई – दहीहंडीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रो-कबड्डीप्रमाणे प्रो-दहीहंडी सुरू होणार असल्याची घोषणा केली असून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. गोविंदाना शासनाच्या इतर सुविधांचाही लाभ मिळणार आहे. यासोबतच शासकीय नोकरीत 5 टक्के स्थान देण्यात येणार आहे. तसेच दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.
गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.